अमेरिकेतील प्रतिष्ठेची ‘राष्ट्रीय जिओग्राफिक शब्दार्थ स्पर्धा’ जिंकण्याचा मान १४ वर्षीय करण मेनन या भारतीय वंशाच्या अमेरिकन विद्यार्थ्यांने पटकावला. या स्पर्धेतील तीनही सर्वोच्च जागा मिळवण्यात भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांना यश आले आहे.
न्यू जर्सी येथे राहणाऱ्या आठव्या मानांकित मेननला स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्पर्धकांचा सामना करावा लागला. ‘नॅशनल जिओग्राफिक’च्या मुख्यालयात बुधवारी झालेल्या या स्पर्धेत करण याने यंदाचा विजेता म्हणून मान मिळवला. त्याला यासाठी ८५ हजार अमेरिकन डॉलर इतकी महाविद्यालयीन शिष्यवृत्ती बहाल करण्यात आली आहे. ‘नॅशनल जिओग्राफिक’च्या दोन बेटांवरील आगामी मोहिमांमध्ये करणचा समावेश करण्यात येईल. याशिवाय ‘नॅशनल जिओग्राफिक सोसायटी’चे आजीव सभासदत्व देण्यात आले आहे.  
विशेष म्हणजे या स्पर्धेत दहा स्पर्धकांपैकी सात जण भारतीय वंशाचे होते.