भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरण प्रक्रियेअंतर्गत १० हजार अमेरिकन ‘सिग सउर अ‍ॅसॉल्ट रायफल्स ‘ (American SiG Sauer assault) ची पहिली खेप भारताला मिळाली आहे. या अत्याधुनिक रायफलचा वापर जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना समूळ नष्ट करण्यासाठी केला जाणार आहे. भारताने लष्कराला अधिक सक्षम बनवण्साठी व अद्यावत शस्त्रसाठ्याने परिपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने तब्बल ७२ हजार ४०० रायफल निर्मितीचे कंत्राट दिले होते.

सद्यस्थितीस या रायफल जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय सेनेच्या उत्तर कमांडकडे सोपवण्यात आल्या आहेत. भारतीय लष्कराची ही उत्तर कमांड जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी अभियान राबवते, तसेच पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या सर्व कारवायांना सडतोड प्रत्युत्तर देते.

या रायफलचा भारतीय लष्कराच्या शस्त्रसाठ्यात समावेश झाल्याने लष्कराच्या मारक क्षमतेत वाढ झाली आहे. कारण, ही रायफल जवळून तसेच दूरून मारा करणाऱ्या रायफल श्रेणीमधील सर्वात अद्यावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी आहे. भारतीय लष्कराला या ७२ हजार ४०० अद्यावत रायफलने सुसज्ज करण्यासाठी सरकारकडून ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. अमेरिकेतील शस्त्र निर्मिती करणारी सिग सउर ही कंपनी या रायफल भारताला देत आहे.

या सर्व रायफल्सची निर्मिती अमेरिकेतच केली जाणार असून वर्षभराच्या आत भारतीय सेनेला त्या सोपवण्यात येतील. या रायफल्सचे कंत्राट फास्ट-ट्रॅक पर्चेस (एफटीपी) अंतर्गत देण्यात आले आहे. पाकिस्तान व चीनचा वाढता धोका लक्षात घेता, भारतीय सेनेला अद्यावत अशा शस्त्रसाठ्याने सुसज्ज करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवरच या ७२ हजार रायफल्सची खरेदी केली गेली आहे. यापैकी ६६ हजार रायफल्स भारतीय सेनेसाठी असणार आहेत, तर दोन हजार भारतीय नौदलास तर चार हजार रायफल्स हवाई दलाकडे सोपवल्या जाणार आहेत.