चायनीज हॅकर्स व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून भारतीय युजर्सना टार्गेट करत असून डाटा गोळा करत आहेत. भारतीय लष्कराने यासंबंधी अलर्ट दिला असून ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत भारतीय लष्कराने मेसेजिंग अॅप वापरताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. भारतीय लष्कराने चार महिन्यांपुर्वी वास्तविक नियंत्रण रेषेवर तैनात जवानांना व्हॉट्सअॅप आणि इतर मेसेजिंग अॅपचा वापर करताना सुरक्षेची काळजी घेण्याचा आदेश दिला होता.

भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन व्हिडीओ ट्विट करण्यात आला असून चायनीज डिजिटल वर्ल्ड भेदण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

‘डिजिटल वर्ल्डमध्ये घुसखोरी करण्यासाठी चिनी प्रत्येक प्रकारच्या मीडिअमचा वापर करत आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून सिस्टीम हॅक करण्याची नवीन पद्धत सध्या त्यांनी अवलंबली आहे. +86 पासून सुरु होणारे चिनी क्रमांक तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शिरकाव करतात आणि तुमचा डाटा चोरण्यास सुरुवात करतात’, असं व्हिडीओत सांगण्यात आलं आहे.

भारतीय लष्कराने युजर्सना सतर्क राहण्याचा तसंच आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपचं रोज ऑडिट करत कोणी +86 ने सुरु होणारा मोबाइल क्रमांक अॅड झालेला तर नाही ना याची काळजी घेण्यास सांगितलं आहे. जर तुम्ही सिमकार्ड बदललं असेल, तर ते तात्काळ नष्ट करुन टाका असं आवाहनही व्हिडीओत करण्यात आलं आहे. सोबतच मोबाइल क्रमांक बदलला असल्यास आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला कळवा असंही सांगण्यात आलं आहे. तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून लीक झालेली माहिती चायनीज हॅकर्सच्या हाती लागत असल्याचा इशारा यावेळी लष्कराने दिला आहे.