सिंगापूरमधील सेनटोसा बेटावर मंगळवारी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यातील ऐतिहासिक शिखर परिषद होत असताना त्याच्या वार्ताकनासाठी तीन हजार पत्रकार जमले आहेत. त्यांच्यासाठी खास भारतीय खाद्यपदार्थाची व्यवस्था करण्यात आली असून त्यात पुलाव व चिकन कुर्मासह इतर देशांच्या ४५ डिशेसचा समावेश आहे.

ट्रम्प व किम हे भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेसहा, तर तेथील प्रमाणवेळेनुसार सकाळी ८ वाजता सेनटोसा येथील कॅपेला हॉटेलमध्ये चर्चा करणार आहेत. उत्तर कोरियाने अण्वस्त्रे नष्ट करावीत व द्वीपकल्पात शांतता नांदावी हा या चर्चेचा उद्देश आहे. स्थानिक व परदेशी पत्रकार येथे वार्ताकनासाठी जमले असून अन्नपदार्थाची चंगळ आहे.

दी स्ट्रेट टाइम्सने म्हटले आहे, की १५ प्रकारच्या खाद्यपद्धतीतील ४५ डिशेस ठेवण्यात आल्या आहेत. भारतीय, सिंगापुरी, मलेशियन, व्हिएतनामी, थाय, कोरियन, जपानी, चिनी, फ्रेंच , अमेरिकन, इटालियन, इंग्लिश, ऑस्ट्रेलियन,  ब्राझिलियन, मध्यपूर्व या सर्व देशातील खाद्यपदार्थ यात आहेत.

भारतीय खाद्यपदार्थात पुलाव, फिशकरी, चिकन करी, दाल, चिकन कुर्मा, पापड यांची व्यवस्था एफ १ पिट बिल्डिंग येथे करण्यात आली आहे. सिंगापुरी पदार्थात लाक्सा, चिकन राइस यांचा समावेश आहे. अनेक केटरर्सना यात काम मिळाले असून कॉमन गुड कंपनी, युडर्स आइसक्रीम, दी सूप स्पून यांना खाद्यपदार्थ पुरवण्याचे कंत्राट मिळाले आहे. किमची जिगाइ सूप व किमची आइसक्रीम हे खास कोरियन पदार्थ यात असतील. किमची हा मसालेदार कोबीच्या लोणच्यासारखा पदार्थ आहे. भारताचे खानसामा अमित वर्मा यात सहभागी असून एकूण २५ खानसामे काम करणार आहेत.

एकूण ७००० जेवणातून ७.२ टन अन्न पुरवले जाणार असून सॅट्स किचनने यापूर्वी डब्ल्यूटीए अंतिम सामन्यावेळी २०१७ मध्ये ८००० जेवणे, ७२ डिशेस व ९.१ टन अन्न पुरवले होते. या वेळीही सॅटस् किचनलाच कंत्राट मिळाले आहे.

  • पुलाव, चिकन कुर्मा, फिशकरी, चिकनकरी, दाल, पापड
  • २५ खानसामे दोन पाळ्यात काम करणार
  • विविध अन्नपद्धतीतील ४५ डिशेस
  • ७.२ टन अन्न पुरवले जाणार