भारतीय अर्थव्यवस्था ही सध्या डळमळीत अवस्थेत आहे अशी टीका अर्थशास्त्रातले नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी केली आहे. मागील पाच ते सहा वर्षात थोडीफार प्रगती तरी अर्थव्यवस्थेने केली होती. मात्र आता ती शक्यताही मावळली आहे असंही बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. सध्या जी काही आकडेवारी समोर येते आहे ती भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीच्या दृष्टीने मुळीच चांगली नाही असंही मत अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केलं. अमेरिकेतल्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॅनर्जी यांनी ही प्रतिक्रिया दिली.

सध्याची भारतीय अर्थव्यवस्था ही अत्यंत डळमळीत झाली आहे असं मत अभिजित बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं. आजच अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला. जागतिक स्तरावरचं दारिद्र्य कमी करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल अभिजित बॅनर्जी यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीने त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत जेव्हा त्यांना भारतीय अर्थव्यवस्थेबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. एवढंच नाही तर सध्याची भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था डळमळीत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

जगातलं दारिद्र्य कमी व्हावं यासाठी आम्ही गेल्या वीस वर्षांपासून प्रयत्न करतो आहोत असंही बॅनर्जी यांनी मुलाखतीत सांगितलं. द्रारिद्र्य ही समस्या आहे, त्यावर कायमस्वरुपी उपाय योजण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. मात्र भारतीय अर्थव्यवस्थेबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.

एकीकडे विरोधक सरकारवर ढासळत्या अर्थव्यवस्थेवरुन आणि समोर आलेल्या जीडीपीच्या आकडेवारीवरुन टीका करत असताना आता अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल नोबेल मिळालेल्या अभिजित बॅनर्जी यांनीही ढासळत्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे.