व्हिसा नियंत्रणाच्या भीतीने कार्यशैलीत बदल

अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर एच-१ बी व्हिसांवर नियंत्रण आणण्याच्या भीतीने भारतीय माहिती-तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांनी आता नवा पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारच्या व्हिसाच्या आधारे भारतातून प्रशिक्षित मनुष्यबळ अमेरिकेत पाठवण्याऐवजी तेथील स्थानिक उमेदवारांची भरती करणे आणि अमेरिकी आयटी कंपन्या विकत घेणे अशी रणनीती अवलंबण्याच्या तयारीत भारतीय कंपन्या आहेत.

भारतातील आयटी उद्योग १५० अब्ज डॉलर इतका मोठा आहे. भारतीय आयटी कंपन्यांसाठी अमेरिका ही मोठी बाजारपेठ आहे. टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस, इन्फोसिस आणि विप्रो या तीन मोठय़ा कंपन्यांनी २००५ ते २०१४ या काळात एच-१ बी व्हिसाच्या आधारे अमेरिकेत ८६,००० तंत्रज्ञ पाठवले आहेत. या कंपन्यांच्या नफ्याचा मोठा हिस्सा तेथून येतो.

मात्र ट्रम्प यांनी निवडणूक प्रचाराच्या वेळी स्थानिकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी परदेशी स्थलांतरितांवर आणि एच-१ बी व्हिसांवर मर्यादा घालण्याचे संकेत दिले होते. आता ते निवडून आले आहेत आणि जानेवारीत सत्ता हाती घेतील. त्यानंतर ट्रम्प कोणते धोरण राबवतात याबाबत भारतीय आयटी कंपन्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ट्रम्प यांनी एच-१ बी व्हिसांवर नियंत्रण आणले तर त्यांना भारतीय कंपन्यांना आपल्या कार्यशैलीत बदल करावा लागणार आहे. त्यासाठी नवी रणनीती तयार करण्याच्या कामी भारतीय कंपन्या सध्या गुंतल्या आहेत.

अमेरिकेतील ग्राहक कंपन्यांना सेवा देण्यासाठी भारतातून तंत्रज्ञ पाठवण्याऐवजी अमेरिकेतीलच शिक्षणसंस्थांमधून स्थानिक पदवीधरांची भरती करणे या पर्यायाचा गांभीर्याने विचार सुरू आहे. त्याबरोबरच अमेरिकेतील आपल्या कामाचे अधिक यांत्रिकीकरण करून मनुष्यबळाची गरज कमी करणे हा पर्यायदेखील विचारात घेतला जात आहे. अमेरिकेतील बदलत्या परिस्थितीबरोबरच ब्रिटनच्या युरोपीय संघातून बाहेर पडण्याने तेथील बँका व विमा कंपन्याही माहिती तंत्रज्ञान सेवांवर कमी खर्च करत आहेत. त्यामुळे पारंपरिक सेवा देण्याऐवजी क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित सेवा पुरवण्याकडेही भारतीय कंपन्यांचा कल वाढू लागला आहे. काही भारतीय कंपन्यांनी अमेरिकेतील कंपन्या विकत घेण्याचीही तयारी केली आहे. इन्फोसिसने गेल्या दोन वर्षांत नोआ कन्सिल्टग आणि कॅलिडस टेक्नॉलॉजीज या कंपन्या विकत घेतल्या आहेत.