बीजिंग : करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे केंद्र असलेल्या वुहानमध्ये या रोगाचा संसर्ग होण्याच्या प्रकरणांत मोठी वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विद्यापीठांतील व्यायामशाळा आणि वसतिगृहे यांचे तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय चिनी अधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे, हुबेई प्रांतातील भारतीय व पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी आपल्याला तेथून हलवण्याबाबत आपल्या सरकारांना निकराची विनंती केली आहे.

करोना विषाणूमुळे बुधवारी एकाच दिवसात २५४ लोक मृत्युमुखी पडल्यामुळे या रोगाला आतापर्यंत बळी पडलेल्यांची संख्या १ हजार ३६७ झाली आहे.

हुबेई युनिव्हर्सिटी ऑफ चायनीज मेडिसिनमधील व्यायामशाळेचे रुग्णालयात रूपांतर करण्याची घोषणा विद्यापीठाने केल्यामुळे, तेथे शिकणाऱ्या तीन भारतीय विद्यार्थ्यांनी आपल्याला तेथून हलवण्याबाबत भारत सरकारला निकराची विनंती केली आहे. अनेक भारतीयांना हलवण्यात आले असले, तरी अद्याप ८० ते १०० भारतीय तेथे असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सुमारे १ हजार पाकिस्तानी विद्यार्थी सध्या हुबेई प्रांतात आहेत. त्यांना तेथून न हलवल्याबद्दल पाकिस्तान सरकारवर कडाडून टीका करण्यात आली. आपल्या वसतिगृहांचे करोना विषाणू रुग्णांसाठीच्या हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात येत असल्याची तक्रार त्यांनी केली. वुहानमध्ये अडकून पडलेल्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे निर्देश पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी परराष्ट्र कार्यालयाला दिल्याचे वृत्त ‘डॉन’ या वृत्तपत्राने दिले आहे.