सध्या जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक देश करोनावरील लस विकसितही करत आहेत. रशिया, अमेरिका यांसारख्या देशांना सुरूवातीच्या टप्प्यात यात यशही मिळालं आहे. भारतातदेखील शास्त्रज्ञ दिवसरात्र एक करून लस विकसित करण्याचं काम करत आहे. अशातच मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी पुन्हा एकदा भारताची स्तुती केली आहे. “भारतातील औषध उद्योग केवळ आपल्या देशासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी करोनावरीस लस तयार करण्यास सक्षम आहे. भारतात करोनाची लस विकसित करण्यासाठी भारतीय औषध कंपन्या एक महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत,” असं बिल गेट्स म्हणाले.

“भारत हा मोठ्या आकाराचा आणि अधिक लोकसंख्या असलेला देश आहे. त्यामुळे भारताला या संकटात मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे,” असं गेट्स यावेळी म्हणाले. ‘COVID-19: India’s War Against The Virus’ या डिस्कव्हरीवरी प्लस वाहिनीवरील एका डॉक्युमेट्रीमध्ये त्यांनी भारताच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. “भारतात औषधं आणि लस तयार करणाऱ्या कंपन्या अनेक कंपन्या आहेत ज्या संपूर्ण देशाला मागणीनुसार पुरवठा करू शकतात. जगाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक लसींची निर्मिती होते हे आपल्याला माहितच आहे. सीरम इन्स्टीट्युट यात आघाडीवर आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

“भारतात बायो ई आणि भारत बायोटेकसारख्या अन्य कंपन्यादेखील आहेत. या कंपन्या देशात करोनाची लस तयार करण्यासाठी काम करत आहे,” असं ते म्हणाले. “जागतिक पातळीवर लस निर्माण करणाऱ्या देशांच्या समुहात भारत सामिल झाला आहे. भारतातील औषध उद्योग केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी औषधांचं उत्पादन करण्यास सक्षम असेल. यामुळे आपल्याला मृत्यूंची संख्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत मिळणार आहे. अशा प्रकारे आपण ही महामारी संपवू शकतो,” असंही गेट्स यांनी स्पष्ट केलं.
गेट्स म्हणाले की, “बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन हेदेखील भारत सरकारचे भागीदार आहे. ते विशेषत: बायोटेक्नॉलॉजी विभाग, आयसीएमआर आणि मुख्य वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाकडून ही साधने मिळवण्यास सल्ला व मदत देतात.”