लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना झोपण्यासाठी असलेल्या बर्थवर चढणे सोयीस्कर व्हावे, यासाठी रेल्वेतर्फे आता विशेष पायऱ्यांची सुविधा पुरविण्यात येणार आहे.  कपुरथळा येथील रेल्वे डबे निर्मिती कारखान्यात आणि चेन्नईच्या सर्वसमावेशक रेल्वे डबे निर्मिती कारखान्यात या नव्या डब्यांची निर्मिती करण्यात येत आहे. रेल्वे डब्यांतील या नव्या प्रकारच्या पायऱ्यांमुळे सर्वात वरच्या बर्थवरील प्रवाशांचा बर्थवर चढता उतरतानाचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी रेल्वेने केलेल्या एका सर्वेक्षणात प्रवाशांना येणाऱ्या अडचणींबाबत विचारण्यात आले होते. यात अनेकांनी चालत्या ट्रेनमध्ये बर्थवर चढता-उतरताना होणाऱ्या त्रासाचा उल्लेख केला होता. त्यानंतर रेल्वेच्या २०१५-१६ वर्षाच्या ‘टू डू लिस्ट’मध्ये याचा समावेश करण्यात आला होता. आम्ही सध्या बर्थवर चढण्यासाठी विविध प्रकारच्या पायऱ्यांच्या डिझाईन्स आजमावून पाहत आहोत. प्रथम वर्गाच्या वातानुकूलित डब्यातील बर्थसाठी आम्ही यापूर्वीच नव्या प्रकारच्या पायऱ्या तयार केल्या आहेत. सध्या वातानुकूलित वर्गाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्गाच्या डब्ब्यांसाठी पायऱ्या बनविण्याचे काम सुरू असल्याची माहिती रेल्वे बोर्डाच्या तांत्रिक विभागाचे सदस्य हेमंत कुमार यांनी दिली. या सगळ्या कामात अहमदाबादच्या अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन यांचीदेखील मदत घेण्यात येत आहे. जेणेकरून या पायऱ्या तयार करताना अभियांत्रिकीबरोबरच सौदर्यांचा विचार केला जाईल. सध्या, रेल्वेगाड्यांमध्ये बर्थवर चढण्यासाठी तीन लोखंडी पायऱ्या असतात. त्यामुळे सर्वात वरच्या बर्थवरील प्रवाशाला बर्थवर जाण्यासाठी बरीच कसरत करावी लागत असे. दरम्यान, या पायऱ्यांसाठी प्रत्येक डब्यामागे २०,००० रूपयांचा खर्च येणार असून, त्यामुळे प्रवाशांना पाय ठेवण्यासाठी बरीच मोकळी जागा उपलब्ध होणार आहे.