News Flash

भारतीय महिलेस वाघा सीमेवर सोडण्याचा आदेश

पाकिस्तानी व्यक्तीने बंदुकीच्या धाकाने माझ्याशी विवाह केला

पाकिस्तानी व्यक्तीने बंदुकीच्या धाकाने माझ्याशी विवाह केला, असा आरोप करणाऱ्या व सध्या भारतीय उच्चायुक्तालयात राहात असलेल्या  भारतीय महिलेला मायदेशी परत जाण्यास इस्लामाबाद उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.

पोलिसांनी बंदोबस्तात तिला वाघा सीमेवर सोडून यावे, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. उझमा असे या विशीतील महिलेचे नाव असून, ती नवी दिल्लीची आहे व ती या महिन्यातच पाकिस्तानला गेली होती. तिच्या म्हणण्यानुसार ताहिर अली नावाच्या व्यक्तीशी तिची मलेशियात भेट झाली होती. नंतर तो तिच्या प्रेमात पडला व ३ मे रोजी त्याने पाकिस्तानात तिच्याशी विवाह केला होता. उझमा हिने याचिकेत असे म्हटले होते, की पहिल्या विवाहातील मुलीला थॅलेसेमिया हा रक्तविकार असल्याने मला मायदेशी जाऊ द्यावे. अली याने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत पत्नीला भेटू देण्याची विनंती केली होती. नंतर न्या. मोहसीन अख्तर कयानी यांच्या पीठाने दोन्ही याचिकांची सुनावणी आज केली.

युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यांनी उझमा हिला भारतात जाण्याची परवानगी दिली. तिची स्थलांतर कागदपत्रे तिला परत देण्यात आली, जी अली याने घेतली होती. पत्नीस भारतात परत जाण्याची परवानगी दिल्यामुळे मी नाराज आहे असे अली याने सांगितले व न्यायालयाने बाजूच ऐकून घेतली नाही अशी खंत व्यक्त केली. न्या. कयानी यांनी तिला भारत-पाकिस्तान दरम्यानच्या वाघा सीमेवर पोलिस बंदोबस्तात सोडून येण्याचा आदेश दिला. न्यायाधीशांनी उझमाला विचारले, की तुला अली यास भेटायचे आहे काय, त्यावर तिने नाही असे उत्तर दिले. तिची दोन मिनिटे भेट घेऊ देण्याची मागणी केली होती, पण ती मान्य केली नाही असे अली याने म्हटले आहे.  काही बातम्यांनुसार उझमा सुनावणी दरम्यान कोसळली होती व तिला वैद्यकीय मदत करण्यात आली. ती १ मे रोजी पाकिस्तानात आली होती. त्यानंतर ३ मे रोजी खैबर पख्तुनवा प्रांतातील बुनेर जिल्हय़ात तिचा विवाह अली याच्याशी झाला. नंतर ती इस्लामाबादला आली व भारतीय उच्चायुक्तालयात तिने आश्रय घेतला. अली याने बंदुकीच्या धाकाने आपल्याशी विवाह केला असा आरोप तिने केला तो अली याने फेटाळला होता. तिने घटस्फोट मागितला नाही व मी तो दिलेला नाही, त्यामुळे ती अजून माझी पत्नी आहे असे त्याने सांगितले. पाकिस्तानातील कायद्यानुसार तिचे वकील तिचे प्रतिनिधित्व यापुढेही करू शकतील व ती परत येऊन या प्रकरणाचा पाठपुरावा करू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 2:41 am

Web Title: indian woman claimed she was forced to marry pakistani man
Next Stories
1 ‘रामनाथ गोएंका स्मृती व्याख्यान उपक्रमा’त आज राष्ट्रपतींचे विचारमंथन
2 तिहेरी तलाकच्या मुद्याचा चेंडू सर्वोच्च न्यायालयाच्या रिंगणात
3 विद्यापीठांना नक्षलवाद्यांचे अड्डे बनविण्याचे प्रयत्न
Just Now!
X