पॅरिस येथील हवामान परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही देशांची सौरऊर्जा आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता त्याच्यावर टिप्पणी करणारे आक्षेपार्ह व्यंगचित्र द ऑस्ट्रेलियन या रूपर्ट मरडॉक यांच्या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे त्यात काही भारतीय सोलर पॅनेल म्हणजे सौर पट्टय़ांचे तुकडे करून लोणच्याबरोबर खात आहेत असे दाखवले आहे. अनेकांनी हे व्यंगचित्र वंशविद्वेष करणारे असल्याचे म्हटले आहे.
जागतिक हवामान परिषदेत भारताने विकसित देशांपुढे गुडघे टेकण्यास नकार देऊन त्यांना कार्बन उत्सर्जन कमी करण्यात जास्त जबाबदारी पार पाडण्यास सांगितले होते, शिवाय विकसनशील देशांना हरित तंत्रज्ञानासाठी मदत मिळावी अशी मागणी केली होती. भारताने आंतरराष्ट्रीय सौर आघाडी तयार करण्यात पुढाकार घेतला होता त्यावर आधारित हे व्यंगचित्र असून त्यामुळे समाजमाध्यमात संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी हे व्यंगचित्र वंशविद्वेषी असल्याचे म्हटले आहे.
मक्वायरी विद्यापीठाच्या समाजशास्त्राच्या प्राध्यापक अमंदा वाइज यांनी म्हटले आहे की, हे व्यंगचित्र धक्कादायक असून ते अमेरिका, ब्रिटन व कॅनडात लोकांना मान्य नाही. ते वंशविद्वेषी असून त्यात तिसऱ्या जगातील लोकांची कुचेष्टा केली आहे. तिसऱ्या जगातील लोकांचा तंत्रज्ञानाशी संबंध नाही असेच त्यात दर्शवण्याचा हेतू आहे. ट्विटरवर अनेकांनी या व्यंगचित्राबाबत टीका केली असून भारत हे शाश्वत ऊर्जेचे केंद्र बनत असताना ही खोडी काढल्याचे म्हटले आहे.
व्यंगचित्राचा आणखी एक अर्थ असा की, विकसनशील देशांना तंत्रज्ञानाची गरज नाही त्यांनी केवळ अन्न मिळते आहे की नाही यावर समाधान मानावे. खरे तर भारत तंत्रज्ञान केंद्र म्हणूनही आघाडीवर असून द ऑस्ट्रेलियन या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेले व्यंगचित्र योग्य
नाही असे समाजमाध्यमांवर म्हटले आहे.