अमेरिकेने २०१६ मध्ये दिलेल्या व्हिसापैकी भारतातील तंत्रज्ञान व्यावसायिकांना  ७४.२ टक्के एच १ बी व्हिसा दिले होते व पुढील वर्षी म्हणजे २०१७ मध्ये हे प्रमाण वाढून ७६.६ टक्के झाले होते, असे असले तरी भारतातील एच १ बी व्हिसाच्या प्रत्यक्ष लाभार्थीचे प्रमाण घटले होते असे अमेरिकी नागरिकत्व व स्थलांतर सेवा विभागाच्या अहवालात स्पष्ट केले आहे.

चीनचे एच १ बी व्हिसा प्रमाण या दोन वर्षांत अनुक्रमे ९.३ व ९.४ टक्के होते. एच १बी व्हिसात भारताखालोखाल चीनचा क्रमांक आहे. २०१७ मध्ये प्रत्यक्षात नोकरीची संधी मिळालेल्या भारतीय एच १ बी लाभार्थीचे प्रमाण ४.१ टक्के होते. रोजगार चालू ठेवतानाच १२.५ टक्के भारतीय लोकांना एच १ बी व्हिसा देण्यात आला होता. एच १ बी हा अस्थलांतरित प्रकारचा व्हिसा असून त्यामुळे अमेरिकी कंपन्या परदेशी कामगारांना विशेष कौशल्याच्या कामासाठी रोजगार देऊ शकतात.

विशेष करून तंत्रज्ञान कंपन्या भारतासह इतर देशातील कुशल मनुष्यबळावर अवलंबून आहेत. काही सरकारी संशोधन संस्था व ना नफा संशोधन संस्थाही या व्हिसासाठी अर्ज करीत असतात.

२०१६ मध्ये ७०७३७ भारतीयांना प्रारंभिक  एच १बी व्हिसा मिळाला नंतर हे प्रमाण ६७८१५ झाले. त्याच काळात काम पुढे चालू ठेवण्यासाठीचा व्हिसा १८५४८९  भारतीयांना मिळाला. २०१७ मध्ये एकूण २७६४२३ तर २०१६ मध्ये २५६२२६ जणांना व्हिसा मिळाला. २०१६ मध्ये ८२००० डॉलर्स वेतनासाठीचे तर २०१७ मध्ये ८५००० डॉलर्स वेतनासाठीचे लोक लाभार्थी ठरले.