चंद्रावर मुबलक पाणीसाठा आहे, अशी माहिती भारताच्या चांद्रयान १ मार्फत अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना मिळाली आहे. याबाबत त्यांनी भारतीय चांद्रयान १ चे आभारही मानले आहेत. चंद्राच्या पृष्ठभागाखाली पाण्याचे अनेक साठे मोठ्या प्रमाणावर आहेत अशी माहिती अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी पीटीआय या वृत्तसंस्थेलाही दिली आहे. हे पाणी लाव्हा रसापासून तयार झालेल्या काचेच्या गोळ्यांच्या आत आहे अशीही माहिती पुढे समजली आहे. हे पाणी चंद्रावर अपेक्षित असेल्या पाणी साठ्यापेक्षा कितीतरी मुबलक प्रमाणात आहे असंही अमेरिकेनं म्हटलं आहे. त्यामुळे आता भविष्यात या पाण्याा उपयोग चांगल्या प्रकारे करता येणं शक्य होऊ शकतं असंही शास्त्रज्ञांना वाटतं आहे.

चंद्रावर जाऊन राहणं शक्य आहे की नाही याबाबत अजून कोणताही ठोस निष्कर्ष निघालेला नाही, मात्र भविष्यात चंद्रावर वसाहती झाल्या तर त्यांना या पाण्याचा उपयोग होऊ शकतो अशीही माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. पृथ्वीपासूनच चंद्राची निर्मिती झाली आहे. मात्र या निर्मिती काळात ज्वालामुखीच्या लाव्हारसाचे अनेक थर चंद्रावर आहेत ज्या थरांच्या आत असलेल्या काचेच्या गोळ्यांच्या आत पाण्याचे साठे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

पहिल्या चांद्रयान मोहिमेच्या दरम्यान चंद्रावर पाणी नसल्याची बाब समोर आली होती, मात्र आता पाण्याचे स्त्रोत आणि ते कोणत्या स्वरूपात आहेत याची माहिती उपलब्ध झाली आहे असंही अमेरिकेनं म्हटलं आहे. चंद्राच्या बाबतीत सुरू असलेल्या अभ्यासाद्वारे आणि निरीक्षणाद्वारे अनेक छोट्या मोठ्या गोष्टी समोर येत असतात. मात्र भारताच्या चांद्रयानामुळे अमेरिकेला मोलाची माहिती मिळाल्याचं या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. चंद्रावर खडक आणि क्षार यांचं प्रमाण कसं आणि किती आहे याचाही अभ्यास सुरू आहे. मात्र पाण्याचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत ही बाब निश्चितच समाधानाची म्हटली पाहिजे.

चंद्राचे फोटो, त्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास, पृथ्वीसोबत चंद्रावर होणारे बदल याचा आम्ही सातत्यानं अभ्यास करत असतो. चंद्रावर पाणी सापडलं आहे ही गोष्ट आनंदाची असली तरीही ते पाणी पृथ्वीवर ज्या प्रकारे आहे त्या स्वरूपात नाही. मात्र हा अत्यंत महत्त्वाचा आणि भविष्यात उपयोगी येणारा शोध आहे असंही शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.