जगभरात थैमान घालत असलेल्या करोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक देशात वाढतच चालाला आहे. सलग चौथ्या दिवशी देशात करोना रुग्णांच्या संख्येत ७५ हजारांहून अधिक वाढ झाली असून गेल्या २४ तासांमध्ये ७८ हजार ७६१ नव्या रुग्णांची नोंद झाली. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. त्याआधीच्या तीन दिवसांमध्ये अनुक्रमे ७६ हजार ४७२, ७५ हजार ७६० आणि ७७ हजार २६६ रुग्णांची भर पडली होती. ७ ते २३ ऑगस्ट या काळात रुग्णांची संख्या १० लाखांनी वाढली.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहतीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३५ लाख ४२ हजार ७३४ इतकी झाली आहे. यापैकी सात लाख ६५ हजार ३०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सकारात्मक बाब म्हणजे आतापर्यंत २७ लाख १३ हजार ९३४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशातील करोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ७६ टक्केंपेक्षा जास्त आहे. गेल्या २४ तासांत देशात ९४८ जणांचा करोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरातमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशातीव एकूण करोनााबळींची संख्या ६३ हजार ४९८ इतकी झाली आहे.

देशात करोना चाचणीचे प्रमाण वाढल्यामुळेच रुग्णांची संख्याही वाढत आहे. आयसीएमआरच्या माहितीप्रमाणे देशात आतापर्यंत ४ कोटी १४ लाख ६१ हजार ६३६ करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर २९ ऑगस्ट रोजी दहा लाख ५५ हजार २७ करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी १६,८६७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकणू रुग्णांची संख्या ७,६४,२८१ अतकी झाली आहे.