अमेरिकी निर्बंधांमुळे भारताच्या इंधन पुरवठय़ावर परिणाम

अमेरिकेने इराणबरोबर २०१५ साली केलेल्या अणुकरारातून माघार घेऊन इराणविरुद्ध निर्बंध लागू केल्याने भारताला तेथून आयात केल्या जाणाऱ्या खनिज तेलात कपात करावी लागणार आहे.

इराण अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम थांबवत नसल्याचे कारण देत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी केलेल्या बहुराष्ट्रीय अणुकरारातून माघार घेतली. तसेच इराणवर नव्याने आर्थिक निर्बंध लादले. त्यानुसार इराणशी तेल आणि अन्य व्यापारी संबंध ठेवणाऱ्या देशांवरही अमेरिका निर्बंध लादू शकते. इराणवरील तेलविषयक निर्बंध ४ नोव्हेंबरपासून लागू होत आहेत. अमेरिकेकडून होणारी संभाव्य कारवाई थोपवायची असेल तर तत्पूर्वी इराणमधून होणारी तेल आयात थांबवावी लागणार आहे.

या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारताच्या तेल खात्याने सरकारी तेल कंपन्यांना त्याची तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार भारतीय सरकारी तेल कंपन्यांनी एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यांत मोठय़ा प्रमाणात तेल आयात केली. या काळात भारत इराणकडून दररोज ६,५८,००० बॅरल तेल आयात करत होता; पण आता सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत त्यात ४५ टक्के कपात होऊन ते प्रमाण ३,६०,००० बॅरलवर येण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या कारवाईतून सूट मिळावी म्हणून भारताने अमेरिकेशी खास चर्चा सुरू केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी गेल्या आठवडय़ात नवी दिल्लीला भेट दिली. त्या वेळी भारताला इराणकडून तेल आयात करू देण्याची परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न करण्यात आले. मात्र अमेरिकेकडून त्याबाबत ठोस आश्वासन मिळाले नाही. सवलत मिळवण्यासाठी इराणकडून होणारी तेल आयात हळूहळू कमी करून थांबवावी लागेल.

मात्र जागतिक बाजारपेठेत तेलाचे दर वाढत असताना आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य कमी होत असताना तसे करणे भारताला परवडणारे नाही.

निर्बंध डावलणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा

वॉशिंग्टन : इराणवर लादलेले निर्बंध डावलून त्या देशाकडून खनिज तेल आयात करणाऱ्या देशांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अमेरिकेने दिला. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातील वरिष्ठ अधिकारी मनीषा सिंग यांनी सांगितले की, निर्बंध न पाळणाऱ्या देशांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. काही मित्रदेशांशी या विषयावर चर्चा सुरू आहे. मात्र इराणचा अणुकार्यक्रम थोपवण्यासाठी एकत्र प्रयत्नांची गरज आहे हे आम्ही त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहोत.