‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या शोचा निर्माता आणि अँकर सुहेब इलियासीला पत्नीच्या हत्येप्रकरणी कडकडूम्मा सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र या शिक्षेलाच आव्हान देणारी याचिका सुहेब इलियासीने आता दिल्ली हायकोर्टात दाखल केली आहे. याप्रकरणी १५ मार्चला सुनावणी होणार आहे. सत्र न्यायालयाने दिलेला निर्णय दिल्ली हायकोर्ट कायम ठेवणार की वेगळा निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सुहेबला सत्र न्यायालयाने जेव्हा शिक्षा सुनावली तेव्हा तो ढसाढसा रडला होता. तसेच मी निर्दोष असून माझ्यावर अन्याय होत असल्याचे त्याने म्हटले होते. सुहेबने त्याची पत्नी अंजूची हत्या केली. त्याप्रकरणी त्याला मार्च २००० मध्ये अटकही करण्यात आली. त्यानंतर १७ वर्षांनी म्हणजेच डिसेंबर २०१७ मध्ये या प्रकरणी सत्र न्यायालयाने अंजूच्या हत्येप्रकरणी सुहेब इलियासीला दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याच शिक्षेला आव्हान देणारी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

सुहेब इलियासीने १९९८ मध्ये ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या शोची सुरुवात केली. अल्पावधीतच हा शो प्रचंड लोकप्रिय झाला. सुहेब इलियासिला यामुळे टीव्ही जगतात अमाप प्रसिद्धी मिळाली.

२००० साली आपल्या पत्नीने म्हणजेच अंजूने आत्महत्या केल्याचे सुहेबने त्याच्या मित्राला सांगितले. मात्र अंजूच्या कुटुंबीयांनी सुहेबनेच तिची हत्या केली असा आरोप केला. ज्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. मार्च २००० मध्ये सुहेबला याच हत्येप्रकरणी अटक करण्यात आली.

त्यानंतर काही दिवसांनी सुहेब इलियासीला जामीन मिळाला. मात्र अंजूच्या कुटुंबीयांनी कोर्टात धाव घेतली. २०१४ मध्ये हायकोर्टाने पोलिसांना हत्येच्या कलमाखाली या प्रकरणाचा तपास सुरु करा असे आदेश दिले. पोलिसांनी या अनुषंगाने तपास सुरु करताच नवी माहिती समोर येत गेली.

सुहेब आणि त्याची पत्नी अंजू यांच्यात कायम वाद होत होते. त्यांचे एकमेकांमध्ये पटत नव्हते हे चौकशीतून समोर आले. सुहेब विरोधात मिळालेले सगळे पुरावे पोलिसांनी कोर्टात सादर केले ज्यानंतर अंजूच्या हत्येप्रकरणी सुहेबला दोषी ठरवण्यात आले आणि १७ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला

सुहेब आणि अंजू यांचा प्रेमविवाह झाला होता. अंजूच्या कुटुंबीयांनी या लग्नाला विरोध केला होता मात्र तो न जुमानता या दोघांनी लग्न केले होते अशीही माहिती समोर आली आहे.

इलियासीचे गैरव्यवहार, पैशांची अफरातफर आणि काही अवैध धंदे याविषयी अंजूला पूर्ण कल्पना होता. किंबहुना त्याने ही सर्व चुकीची कामं थांबवावीत अशी तिची इच्छा होती. आपल्या बाळासह ती कॅनडाला स्थायिक होऊ इच्छित होती. पण, इलियासी तिच्या विरोधात होता. त्यामुळेच त्याने अंजूची हत्या केली आणि तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला.

अंजूने धारदार शस्त्राने स्वतःला भोसकून आपले आयुष्य संपवले असे इलियासीने सांगितले होते. मात्र पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत ही हत्या सुहेब इलियासीनेच केल्याचे समोर आले. आता याप्रकरणी दिल्ली हायकोर्ट सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवणार की काही वेगळा निर्णय देणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.