अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच सत्ताधारी पक्षापेक्षा वेगळे राजकीय मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्यही धोक्यात आले आहे, हा आताच्या भाजप प्रणीत राजवटीतील मोठा धोका आहे, असे मत प्रसिद्ध वकील इंदिरा जयसिंग यांनी व्यक्त केले आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर असायला हवे, ते धोक्यात आले आहे पण त्याच जोडीला सत्ताधारी पक्षाच्या विरोधी मत व्यक्त करणे आता अवघड होऊन बसले आहे. ते स्वातंत्र्यही धोक्यात आले आहे असे सांगून त्या म्हणाल्या की, भाजपने त्यांच्या कार्यकारिणीत राज्यघटनेचा जो अर्थ लावला आहे तो मुळीच मान्य नाही. माझी राज्यघटनेकडे पाहण्याची दृष्टी भाजपसारखी नसू शकते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात त्या बोलत होत्या. ‘व्हॉट डज फिडेलिटी टू द कॉन्स्टिटय़ूशन मीन’ या विषयावर त्या बोलत होत्या. २६ जून १९७६ रोजी आणीबाणी जाहीर करण्यात आली; त्यात घटनेची पायमल्ली करण्यात आली व आता तशीच परिस्थिती राज्यघटना हवी तशी वाकवून त्याचा हवा तसा अर्थ लावण्यामुळे निर्माण झाली. राष्ट्रवाद व राष्ट्रविरोध यामुळे जबाबदारीचे तत्त्व बाजूला पडले आहे.