जगभरामध्ये करोनाची दहशत असतानाच इंडोनेशियामधील एका मंत्र्याने या जीवघेण्या विषाणूची तुलना पत्नीशी केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. इंडोनेशियांचे संरक्षण मंत्री मोहमद महफूद एमडी यांनी करोना हा पत्नीसारखा असतो असं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानंतर अनेक महिलांनी तसेच स्त्रीयांशी संबंधित सोशल नेटवर्किंग ग्रुपवर मोहमद यांच्यावर टीका केली जात आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मोहमद यांनी येथील एका विद्यापिठातील विद्यार्थ्यांशी ऑनलाइन माध्यमातून संवाद साधताना काही दिवसांपूर्वी हे वादग्रस्त वक्तव्य केलं.

करोनामुळे जग कायमचं थांबून राहिल का यासंदर्भातील प्रश्नाला मोहमद उत्तर देत होते. यावेळी त्यांनी लोकांनी आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं शिकलं पाहिजे मात्र ते करत असतानाच त्यांना त्यांच्या आरोग्याकडे अधिक लक्षही देणं गरजेचं आहे असं मत नोंदवले. याचसंदर्भात बोलताना त्यांनी एका सहकाऱ्याकडून आलेल्या मजेदार फोटोचा उल्लेख केला. “करोना हा तुमच्या पत्नीसारखा असतो. सुरुवातीला तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करता. मग तुम्हाला कळतं की त्याच्यावर ताबा मिळवणं शक्य नाही. मग तुम्ही त्याच्याबरोबर जगायला शिकता,” असं वक्तव्य त्या फोटोतील मजकुराचा संदर्भ देताना मोहमद यांनी केलं.

मोहमद यांच्या या वक्तव्यावरुन आता इंडोनेशियामधील राजकारण चांगलचं तापलं असून अनेक विरोधकांनी मोहमद यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. महिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक गटांनी मंत्र्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. महिलांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या दिंडा निसा युरा यांनी यासंदर्भात सरकारवर निशाणा साधला आहे. “देशामधील करोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला अपयश येत असतानाच अशाप्रकारच्या वक्तव्यांमधून सरकार विषयाबद्दल गांभीर नसण्याबरोबरच देशातील लैंगिकतावाद आणि महिलांबद्दलचा द्वेष दिसून येतो,” असं युरा म्हणाल्या आहेत.