गोमांसाची मेजवानी(बीफ पार्टी) आयोजित केल्यावरून काश्मीर विधानसभेत मारहाण करण्यात आलेल्या अपक्ष आमदार शेख अब्दुल रशीद यांच्यावर सोमवारी नवी दिल्लीत शाईफेक करण्यात आली. या ‘शाई’हल्ल्याची जबाबदारी
हिंदू सेनेने स्विकारली आहे. तर, शाईफेक करणाऱया दोघांना अटक करण्यात आली आहे. सुधींद्र कुलकर्णी यांच्यासोबत जे झाले तेच आज माझ्यासोबत झाले. अशाप्रकरणांतून भारत आज नेमका कुठे उभा आहे हे जगाने पाहावे, असा टोला रशीद यांनी लगावला आहे.
गोमांसावर बंदीबाबतचे विधेयक जम्मू-काश्मीर विधानसभेत मांडले जाण्याच्या आदल्या दिवशी गोमांसाची मेजवानी आयोजित केल्याबद्दल अपक्ष आमदार शेख अब्दुल रशीद यांना काही भाजप आमदारांनी गुरुवारी सभागृहात मारहाण केली होती. याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी गोंधळ करून सभात्याग केला. सरतेशेवटी मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांनी या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली.