आम आदमी पार्टीचे आमदार सोमनाथ भारती यांच्यावर सोमावारी एका तरुणाने शाई फेकली. ही घटना रायबरेलीमधील सिंचन विभागाच्या गेस्ट हाऊससमोर त्यावेळी घडली जेव्हा आपचे नेते असणारे भारती हे जिल्ह्यांमधील रुग्णालयांची पहाणी करण्यासाठी आले होते. भाजपा आणि हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी भारती यांच्यावर शाई फेकली. त्यानंतर भारती आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर भारती यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सिंचन विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये नजरकैदेत ठेवलं. नंतर त्यांना पोलीस बंदोबस्तामध्ये अमेठीला पाठवण्यात आलं.

त्यानंतर भारती यांनी उत्तर प्रदेशमधील रुग्णालयांसंदर्भात दिलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. दिल्ली सरकारमधील माजी मंत्री आणि सध्या आमदार असणाऱ्या भारती यांना अमेठी पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे. भारती यांच्याविरोधात जगदीशपूर पोलीस स्थानकामध्ये कलम ५०५ आणि १५३ अ अंतर्ग गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदीशपूर पोलिसांनी भारती यांना रायबरेलीमधून अटक केली असून त्यांना दुपारच्या सुमारास अमेठीला आणण्यात आलं. शनिवारी भारती यांनी जगदीशपूरमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीमध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भारती यांना अटक केल्याचे वृत्त समजल्यानंतर त्यांना घेऊन जात असणाऱ्या पोलिसांच्या ताफ्याचा आपच्या कार्यकर्ते पाठलाग केल्याचे समजते. भारती यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये उत्तर प्रदेशमधील रुग्णालयांमध्ये कुत्र्याची पिल्लं जन्माला येतात असं वादग्रस्त वक्तव्य भारती यांनी केलं होतं.

उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारती यांनी अमेठीमध्ये शनिवारी कार्यकर्त्यांसमोर भाषण दिलं. यावेळी राज्यातील योगी सरकारच्या कारभारावर टीका करताना भारती यांच्या जीभेचा ताबा सुटला आणि त्यांनी उत्तर प्रदेशमधील रुग्णालयांमध्ये जन्म घेणाऱ्या बालकांची तुलना कुत्र्याच्या पिल्लांशी केली. “आम्ही उत्तर प्रदेशमध्ये आलो आहोत. येथील शाळा आम्ही पाहिले. येथील रुग्णालये आम्ही पाहिली. परिस्थिती इतकी भयंकर आहे की इथल्या रुग्णालयांमध्ये मुलं तर जन्म घेत आहेत. मात्र कुत्र्याची मुलं जन्म घेत आहेत. अस्पतालों में बच्चे तो पैदा हो रहे हैं, लेकिन कुत्तों के बच्चे पैदा हो रहे हैं),” अशा शब्दात भारती यांनी टीका केली.

२०२२ साली राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आप उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वोसर्वा असणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी मध्यंतरी केली. त्यानंतर आपचे कार्यकर्ते उत्तर प्रदेशमध्ये खूपच सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सोमनाथ भारती रायबरेलीमध्ये पोहचले. भारती यांनी शाई फेकण्याच्या घटनेला भाजपा समर्थकांचे कारस्थान असल्याचं म्हणत राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.