सिकंदराबाद येथे २६ जानेवारी रोजी सापडलेल्या महिलेच्या मृत्यूचे गुढ उकलण्यात यश मिळाल्याचा दावा बुलंदशहराच्या स्थानिक पोलिसांनी केला आहे. मृत महिलेची ओळख पटली असून, तिचे नाव पूनम (२०) आहे. नोएडाच्या जारचा भागामध्ये राहणारी पूनम एका मोबाइल कंपनीमध्ये कामाला होती. पूनमच्या हत्येप्रकरणी बुलंदशहरमध्येच राहणाऱ्या एका जोडप्याला अटक करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

कपिल आणि रुबी शर्मा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कपिल आणि रुबीचे प्रेमसंबंध आहेत. त्यांची लग्न करायची योजना होती. पण मुलीच्या कुटुंबियांचा विरोध होता.

त्यांनी काय प्लान केला?
आपले लग्न होऊ शकत नाही, कुटुंबिय कधीही या लग्नाला मान्यता देणार नाहीत. याची दोघांना कल्पना होती. त्यामुळे त्यांनी एक कट रचला. त्यांनी रुबीच्या शरीरयष्टीशी मिळत्या जुळत्या पूनमची हत्या केली. तिच्या अंगावर रुबीचे कपडे आणि दागिने घातले. मृतदेहाची ओळख पटवता येऊ नये, यासाठी चेहरा पूर्णपणे बिघडवून टाकला. कपडे आणि दागिन्यांवरुन मुलीच्या कुटुंबियांची दिशाभूल करण्याची त्यांची योजना होता. टीव्हीवरील क्राइम शो बघून त्यांनी हा कट रचला होता.

पूनमशी मैत्री केली
प्लाननुसार कपिलने पूनमशी मैत्री वाढवली. तिचा विश्वास संपादन केल्यानंतर २५ जानेवारीला शॉपिंगच्या बहाण्याने तिला बाहेर घेऊन गेला. निर्जन स्थळी कपिलने गळा आवळून पूनमची हत्या केली. त्यानंतर रुबीच्या घराजवळ असणाऱ्या एका गोठयात पूनमचा मृतदेह फेकला.

दरम्यान पूनमच्या कुटुंबियांनी नोएडा पोलिसांशी संपर्क साधून ती बेपत्ता झाल्याची माहिती दिली व कपिलवर संशय व्यक्त केला. नोएडा पोलिसांनी बुलंदशहर पोलिसांना याबद्दल माहिती दिली. सिकंदराबाद पोलीस स्थानकात अपहरणाचा एफआयआर नोंदवण्यात आला. पोलिसांनी कपिलची चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली नंतर रुबीलाही अटक करण्यात आली.