केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून गेल्या १८ महिन्यांच्या कालावधीत आसाममधील घुसखोरीच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला. आसाममधील सर्व दहशतवादी गटांनी शस्त्रे बाजूला ठेवून चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहनही या वेळी गृहमंत्र्यांनी केले.
भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या १८ महिन्यांपासून घुसखोरीच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली असून स्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. आपण स्वत:च हा दावा करीत नाही तर राजकीय विश्लेषकांनीही ही बाब निदर्शनास आणली आहे, असेही गृहमंत्र्यांनी एका निवडणूक सभेत सांगितले.
आसाममध्ये घटना घडत आहेत ही वस्तुस्थिती आहे. २०१४ मध्ये दहशतवाद्यांनी आदिवासींचे हत्याकांड घडविले तेव्हा आपण तातडीने आसामला जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि हिंसाचार आणि दहशतवाद यांचा कोणत्याही स्थितीत संबंध जोडण्यात येऊ नये, असे स्पष्ट केले होते, असेही ते म्हणाले.गृहमंत्री या नात्याने राजनाथ सिंह यांनी सर्व दहशतवाद्यांना शस्त्रे बाजूला ठेवण्याचे आवाहन केले आहे. दहशतवाद्यांच्या काही समस्या असतील तर त्यांनी प्रथम हिंसाचार थांबवावा आणि चर्चेला समोर यावे, आम्ही चर्चेस तयार आहोत, असेही गृहमंत्री म्हणाले.