अस्थाना यांचा वर्माविरुद्ध आक्रमक पवित्रा

देशातील आघाडीची तपास यंत्रणा असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागातच (सीबीआय) तंटा निर्माण झाला आहे. सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असताना त्यांनी संचालक अलोक वर्मा यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

आपल्याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारींच्या दुप्पट, म्हणजे सुमारे एक डझन आरोपांची जंत्री अस्थाना यांनी वर्मा यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध सादर केली आहे.

एक महिन्यापूर्वी सीबीआयने अस्थाना यांची किमान ६ प्रकरणांत चौकशी सुरू असल्याचे निवेदन जारी केले होते. त्याच्या काही दिवसांपूर्वी, अस्थाना यांनी मंत्रिमंडळ सचिवांना एक ‘अतिगोपनीय’ तक्रार पाठवून त्यात संचालकांविरुद्धच्या १२ हून अधिक आरोपांची यादी दिली होती. मांस निर्यातदार मोइन कुरेशी, हरयाणातील भूसंपादनाचे एक प्रकरण यांचा त्यात समावेश होता.

एकमेकांविरुद्ध आरोप- प्रत्यारोपाचे हे सत्र सुरू असताना, सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांच्या वतीने तपास होत असलेल्या आणि आतापर्यंत फारशा माहीत नसलेल्या प्रकरणांचे तपशील उघड होत आहेत. तथापि, सीबीआयमधील हा अंतर्गत संघर्ष तीव्र झाला आहे. वर्मा किंवा अस्थाना यांना इतरत्र पाठवले जाणार असल्याच्या अफवाच असल्याचे सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले. दोन्ही बाजूंनी होत असलेल्या आरोपांच्या फैरींबाबत काय कार्यवाही करायची हे सीबीआयच्या कामकाजावर देखरेख ठेवणाऱ्या केंद्रीय दक्षता आयोगावर अवलंबून असल्याचे ते म्हणाले.

आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार यांसह अनेक गुन्ह्य़ांचे आरोप असलेला उद्योजक मोईन कुरेशी याच्याशी संबंधित एका प्रकरणात २ कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याचा अस्थाना यांच्यावर आरोप आहे. राकेश अस्थाना हे गुजरात कॅडरमधील १९८४च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत.

पदांच्या श्रेणीत दुसऱ्या क्रमांकावरील या अधिकाऱ्याचे नाव असलेला एफआयआर सीबीआयने अधिकृतरीत्या जाहीर केलेला नसला, तरी या यंत्रणेतील आणि सरकारमधील सूत्रांनी त्याला दुजोरा दिला.