International Yoga Day 2018: आज जगभरात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला जात आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात योगदिनानिमित्त प्रात्यक्षिकं सादर केली जात आहेत. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पहाटेपासूनच योगदिन साजरा होण्यास सुरुवात झाली असून स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील डेहरादूनमधील कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या ठिकाणी जवळपास ५० हजार लोक उपस्थित असल्याची माहिती भाजपाने दिली आहे. दुसरीकडे राजस्थानमधील कोटा येथे बाबा रामदेव मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासोबत योगदिन साजरा करत असून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहेत. या ठिकाणी तब्बल दोन लाख लोक एकत्र योग करणार असल्याची माहिती आहे.

मुंबईतही योगदिन साजरा होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित उपराष्ट्रपती वैंकय्या नायडूही उपस्थित आहेत. महत्वाचं म्हणजे १५० देशांमध्ये आज योगदिन साजरा केला जात आहे. भारतीय दूतवासांच्या समन्वयातून हे साध्य होणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने २१ जून २०१४ मध्येच आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर करत, भारताच्या मागणीवर मोहोर उमटवली होती.