स्वातंत्र्यदिनी खबरदारीचा उपाय म्हणून काश्मीर खोऱ्यात काही तासांकरिता स्थगित ठेवण्यात आलेल्या मोबाइल संचांवरील इंटरनेट सेवा नंतर पुन्हा सुरू करण्यात आल्या. स्वातंत्र्य दिन समारंभासाठी संपूर्ण काश्मीर खोऱ्यात सर्वत्र कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. मोबाइल इंटरनेट सेवा पहाटेपासून बंद करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून या सेवा बंद करण्यात आल्या असल्या, तरी एरवी स्वातंत्र्य दिन समारोहाच्या कालावधीत बंद ठेवल्या जाणाऱ्या मोबाइल फोन सेवा मात्र नेहमीप्रमाणे सुरू होत्या. येथील शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियमवरील अधिकृत कार्यक्रम संपल्यानंतर इंटरनेट सेवा बहाल करण्यात आल्या. २००५ पासून सुरक्षा कवायतींचा भाग म्हणून मोबाइल सेवा बंद ठेवली जाते.