भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कारभारात केंद्र सरकार हस्तक्षेप करणार नाही, असे केंद्रीय कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी सोमवारी स्पष्ट केले. खेळामधील गैरप्रकार रोखण्यासाठी बीसीसीआयने पारदर्शकपणे उपाय योजले पाहिजेत, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आयपीएलचा सहावा सिझन स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीमुळे चर्चेत राहिला. राजस्थान रॉयल्सचे एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण हे तीन क्रिकेटपटू, चेन्नई सुपर किंग्ज संघाचा प्रिन्सिपल आणि बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन, बॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंग यांच्यासह अनेक सट्टेबाजांना पोलिसांनी याप्रकरणी अटक केलीये. श्रीनिवासन यांच्यावर राजीनामा देण्यासाठी विविध स्तरांतून दबाव टाकला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी बीसीसीआयच्या कारभारात हस्तक्षेपण करण्यास नकार दिला.
ते म्हणाले, केंद्र सरकारने खेळापासून शक्य तितके दूरच राहायला हवे. सरकार खेळाचे व्यवस्थापन करू शकणार नाही. सरकारने जर खेळामध्ये लक्ष घातले, तर त्यामुळे खेळाचेच नुकसान होईल. जेव्हा खूपच गरज असेल, त्याचवेळी केंद्र सरकार हस्तक्षेप करेल.