राजस्थानचे आयपीएस अधिकारी पंकज चौधरी यांच्यावर केंद्रीय गृहमंत्रालयाने निलंबनाची कारवाई केली आहे. पंकज चौधरी यांच्यावर नियमांचं उल्लंघन तसंच पत्नीला घटस्फोट न देताच दुसऱ्या महिलेशी विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा आणि त्या महिलेकडून संततीप्राप्ती झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आपल्या आदेशात पंकज चौधरी यांनी नियमांचं उल्लंघन केल्याने कारवाई केल्याचं स्पष्ट केलं आहे.

आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर पंकज चौधरी यांनी स्पष्टीकरण देत दुसऱ्या लग्नाच्या आरोपात कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. आपण दुसरं लग्न केलं नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या पहिल्या लग्नाचं प्रकरण सध्या अलाहाबाद उच्च न्यायालयात सुरु आहे. मुकुल चौधरी या पंकज चौधऱी यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. कोणतीही माहिती न देता लग्न केल्याने मुकूल यांनी राज्य महिला आयोगाकडे पंकज चौधरी यांची तक्रार केली होती.

केंद्रीय गृहमंत्रालयाने संघ लोकसेवा आयोगाचा सल्ला घेतल्यानंतर ही कारवाई केली आहे. पंकज यांचं 4 डिसेंबर 2005 रोजी लग्न झालं होतं. कायदेशीररित्या त्यांनी पत्नीला घटस्फोट दिलेला नसतानाही एका दुसऱ्या महिलेसोबत शारिरीक संबंध ठेवले आणि एका मुलालाही जन्म दिला. 14 मे 2011 रोजी बाळाचा जन्म झाला.

आपल्यावर करण्यात आलेल्या कारवाईला आव्हान देणार असल्याचं पंकज चौधरी यांनी सांगितलं आहे. 44 वर्षीय पंकज चौधरी वाराणसीचे रहिवासी आहेत. त्यांचं करिअर नेहमीच वादग्रस्त राहिलं आहे.