इराणच्या लष्करी सरावामुळे संयुक्त अरब अमिरातीच्या अल धफ्रा एअर बेसवर मंगळवारी रात्री अलर्ट जारी करण्यात आला होता. याच बेसवर भारताची पाच ‘राफेल’ फायटर विमाने थांबली आहेत. सोमवारी सकाळी फ्रान्सच्या मेरिनॅक एअर फोर्स तळावरुन राफेल विमानांनी उड्डाण केले. भारतात दाखल होण्याआधी अल धफ्रा एअर बेसवर एकादिवसासाठी ही विमाने थांबली होती. आज दुपारी राफेल विमाने भारतात दाखल होतील.

यूएईची राजधानी अबूधाबीपासून अल धफ्रा एअरबेस तासाभराच्या अंतरावर आहे. अल ध्रफा बेसवर अमेरिका आणि फ्रान्सची फायटर विमाने उतरतात. इराणच्या लष्करी सरावामुळे यूएईमधील अल धफ्रा आणि कतारमधील अल उदीद एअर बेसवर अलर्ट जारी करण्यात आला होता. या दोन एअर बेसच्या दिशेने इराणची मिसाइल येत असल्याचे संकेत मिळाल्यानंतर हा अलर्ट जारी करण्यात आला असे वृत्त सीएनएनच्या बारबारा स्टारर यांनी दिले.

अलर्ट जारी होताच तळावरील कर्मचाऱ्यांना स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा निर्देश देण्यात आले पण कुठल्याही तळावर ही मिसाइल्स धडकली नाहीत. भारताची राफेल विमानांची पहिली तुकडी अल धफ्रा बेसवर असल्याने चिंता निर्माण झाली होती. इराणने युद्ध सराव करताना डागलेली ही तीन क्षेपणास्त्रे अल धफ्रा आणि अल उदीद एअर बेसजवळच्या समुद्रात पडली असे फॉक्स न्यूजने वृत्त दिले आहे. भारतात येणाऱ्या राफेल विमानांमध्ये तीन सिंगल सीटर आणि दोन डबल सीटर आहेत.