इराणने अणुचाचणी बंदी करारावर स्वाक्षरी करून आपण कधीही अणुस्फोट चाचणी करणार नाही याची हमी द्यावी, असे संयुक्त राष्ट्रांच्या अणुचाचणी बंदी करार संघटनेचे अध्यक्ष लॅसिनो झेरबो यांनी म्हटले आहे. त्यांनी काल दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, इराणने अणुचाचणी बंदी करारावर स्वाक्षरी केली नाही तर इराणबरोबरच्या अणु कराराबाबत संशयाला जागा राहील, इराणच्या हेतूंवर लोकांचा विश्वास बसणार नाही. इराणने वाटाघाटीपूर्वी र्सवकष अणुचाचणी बंदी करार म्हणजे सीटीबीटीवरही स्वाक्षरी करणे गरजेचे असून आपण अण्वस्त्रे तयार करणार नाही याची हमी देणे गरजेचे आहे. या कराराला इराणने आता मंजुरी दिली तर अमेरिका व इतरत्र विश्वासाचे वातावरण तयार होईल. अण्वस्त्रप्रसारबंदी करार केल्यास इराणचे स्थान आणखी भक्कम होईल. सीटीबीटी संघटनेचे १९६ देश सदस्य असून त्यातील १८३ देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. पण इस्रायल, इराण, इजिप्त, भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया, अमेरिका व चीन या देशांनी मान्यता न दिल्याने हा करार अमलात आलेला नाही. इराणने मान्यता दिली तर इजिप्त व मध्यपूर्वेतील देश या करारास मान्यता देऊ शकतील. इराण किंवा इतर कुठला देश अणुचाचण्या करतो की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी सीटीबीटी संघटना १ अब्ज डॉलर खर्च करीत आहे.