Iran Fires Missiles at US: इराणने अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला असून या हल्ल्यात ८० जण मारले गेले असल्याचा दावा केला आहे. इराणमधील इंग्लिश न्यूज चॅनेल प्रेस टीव्हीने यासंबंधी ट्विट केलं आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, इराकमधील अमेरिकेच्या तळांवर इराणकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ८० जण मारले गेले आहेत. जर न्यूज चॅनेलने केलेल्या दाव्यात तथ्य असेल तर अमेरिकेसोबतची लढाई अजून गंभीर स्वरुप धारण करु शकते.

दरम्यान, अमेरिकेने मात्र हल्ल्यानंतरही सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “ऑल इज वेल! इराणकडून इराकमधील दोन लष्करी हवाई तळांवर हल्ला करण्यात आला आहे. जीवितहानी आणि नुकसानाची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत सगळं काही ठीक आहे. सध्या तरी आमच्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली आणि सुसज्ज सैन्य आहे. उद्या सकाळी आम्ही यासंबंधी निवेदन जारी करु”.

अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर ३ जानेवारी रोजी इराकची राजधानी बगदादमध्ये एअरस्ट्राइक करत इराणचे लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांना ठार केलं. कासिम सुलेमानी रिव्हॉल्युशनरी गार्डच्या कुदस फोर्सचे कमांडर होते. कासिम सुलेमानी थेट इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अल खामेनी यांना रिपोर्ट करायचे. यावरुन त्यांचं किती महत्त्व होतं हे लक्षात येतं. त्यांच्या हत्येनंतर इराणमध्ये मोठ्या प्रमाणात रोष असून त्यांच्या हत्येचा बदला घेणार असल्याची धमकी देण्यात आली होती.