जयपूरमध्ये महसूल अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकला असता हाती लागलेलं घबाड पाहून पोलीस अधिकारीही चक्रावले आहेत. जगतपूरमधील शंकर विहार परिसरात हा छापा टाकण्यात आला. यावेळी करोडोंची बेनामी संपत्ती पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साही राम मीना यांच्या निवासस्थानी जेव्हा सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं तेव्हा 82 जागांची मालकी असणारी कागदपत्रं त्यांच्या हाती लागली. मीना राजस्थानमधील कोटा येथे उपायुक्त (नार्कोटिक्स) म्हणून कार्यरत आहेत.

पुढे तपास केला असता जयपूरमधील 25 दुकांनांची कागदपत्रं पोलिसांच्या हाती लागली. महत्त्वाचं म्हणजे यावेळी घरात दोन कोटी 26 लाख रुपयांची रोकडही सापडली. याशिवाय दागिने पोलिसांच्या हाती लागले आहेत ज्यांची किंमत सहा लाखांपर्यंत आहे.

याव्यतिरिक्त मुंबईत अणसाऱ्या एका प्लॅटची कागदपत्रंही पोलिसांना सापडली आहेत. जयपूरमधील संगनेर येथे 1.2 हेक्टर जमीन, पेट्रोल पंप आणि मॅरेज गार्डनही त्यांच्याकडे असल्याचं तपासात समोर आलं आहे. मीना यांनी लाच घेऊन ही सर्व संपत्ती उभी केली आहे. मदत केल्याच्या बदली ते लोकांकडून पैसे घेत होते. लाच घेत असतानाच त्यांना पोलिसांनी अटक केली आणि यासोबत त्यांची बेनामी संपत्ती आणि गुपित उघड झालं.