राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटला आहे. मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानमध्येही अनुभवी अशोक गेहलोत यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्य ‘पायलट’ असतील सचिन ‘को-पायलट’ असतील. त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मागच्या दोन दिवसांपासून राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळयात पडणार ? यावरुन विविध तर्क-विर्तक लढवले जात होते.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तरुण नेतृत्वाला संधी देतील असे वाटत होते. पण मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानमध्येही काँग्रेसने अनुभवाला पसंती देत अशोक गेहलोत यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली. अशोक गेहलोत यांनी यापूर्वी दोन वेळा राजस्थानचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. सचिन पायलट राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. येत्या १७ डिसेंबरला सोमवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी माहिती भावी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिली.

२०१३ मध्ये भाजपाने राजस्थानात काँग्रेसचा धुव्वा उडवला होता. त्यानंतर सचिन पायलट यांनी पक्ष बांधणीसाठी प्रचंड मेहनत घेतली व राजस्थानात काँग्रेसचे सरकार आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. राजस्थानमध्ये पाच वर्ष प्रचंड मेहनत केली आहे. त्यामुळे न्याय मिळाला पाहिजे असे सचिन पायलट यांनी राहुल गांधींना सांगितले असे इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले होते.

राजस्थानातील काँग्रेसचे निरीक्षक के.सी.वेणूगोपाळ यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदासाठी अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट यांची निवड केल्याचे जाहीर केले. अशोक गेहलोत यांची मुख्यमंत्रीपदी निवड केल्याबद्दल मी काँग्रेस अध्यक्ष आणि अन्य आमदारांचे आभार मानतो असे सचिन पायलट म्हणाले.

मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करण्याच्या काहीवेळ आधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी  अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यासोबतचा एक फोटो टि्वट करुन ‘युनायटडे कलर्स ऑफ राजस्थान’ असा संदेश त्याखाली लिहिला होता. कालही मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ यांचे नाव जाहीर करण्याआधी राहुल गांधी यांनी कलमनाथ आणि दुसरे प्रमुख दावेदार ज्योतिरादित्य सिंदिया यांच्यासोबतचा असाच एक फोटो टि्वट केला होता. राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवड करण्याआधी आपल्या निवासस्थानी अशोक गेहलोत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केली.