इशरत जहॉं बनावट चकमकप्रकरणी मंगळवारी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी पी. पी. पांडे यांनी सीबीआयच्या न्यायालयात आत्मसमर्पण केले. पांडे यांची अटकपूर्व जामिनाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांनी शरणागती पत्करली.
पांडे यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरण्ट जारी करण्यात आले होते. पांडे यांचे वर्तन योग्य नव्हते आणि ते सतत फरार होत असल्यामुळे जामीन मिळण्यास ते पात्र नाहीत, असे न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले.
न्या. बी. एस. चौहान यांच्या पीठाने उपरोक्त शेरा मारला होता. पांडे यांच्याविरोधात सत्र न्यायालयाने वॉरण्ट जारी केले होते. अ‍ॅड. जसपाल सिंग यांनी पांडे यांची बाजू मांडताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यपद्धतीबद्दल काही शंका उपस्थित केल्या. मात्र, त्याची दखल घेण्यास न्यायालयाने नकार दिला.
इशरत जहॉं आणि तिच्या साथीदारांची २००४ मध्ये चकमकीत हत्या करण्यात आली, त्यावेळी पांडे हे अहमदाबादच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त होते. गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतच इशरत जहॉं आणि तिच्या साथीदारांना अहमदाबादच्या सीमेवर मारण्यात आले होते. या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये पांडे यांच्यासह एकूण सात पोलिस अधिकाऱयांची नावे आहेत. गेल्या महिन्यात दाखल करण्यात आलेल्या या आरोपपत्रामध्ये ही चकमक बनावट असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.