इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री अमित शाह आणि माजी पोलीस महासंचालक के. आर. कौशिक यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने नोटीस पाठवली. इशरत जहाँप्रकरणी या दोघांना आरोपी करा, अशी मागणी करणारी याचिका इशरतसह या चकमकीत ठार झालेल्या जावेद शेख ऊर्फ प्रणेश पिल्ले याच्या वडिलांनी न्यायालयात दाखल केली आहे.
इशरत आणि जावेद शेख यांना ठार करण्यात अमित शाह आणि कौशिक यांचा कट होता. त्यामुळे दोघांवर कट रचणे, बेकायदा डांबून ठेवणे आणि हत्या आदी आरोप ठेवण्यात यावे, अशी मागणी जावेदचे वडील गोपीनाथ पिल्ले यांनी याचिकेत केली आहे. इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी सीबीआयने दोनदा आरोपपत्र बनवले. मात्र या आरोपपत्रांमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे सहकारी असलेल्या अमित शाह आणि अहमदाबादचे तत्कालीन पोलीस आयुक्त कौशिक यांचा समावेशच नाही, असे पिल्ले यांनी सांगितले. त्यावरून सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती गीता गोपी यांनी शाह, कौशिक आणि त्याचबरोबर सीबीआयलाही नोटीस पाठवली आहे.
मुंब्य्राला राहणाऱ्या इशरत जहाँ व जावेद शेख यांच्यासह चौघांची १५ जून २००४ रोजी अहमदाबादजवळ पोलीस चकमकीत हत्या करण्यात आली होती. हे चौघेही पाकिस्तानी नागरिक असून, दहशतवाद्यांशी त्यांचे संबंध होते, असा दावा पोलिसांनी केला होता. मात्र ही चकमक बनावट असल्याचे उघड झाले आहे.

‘सीबीआय’वरही आरोप
सीबीआयला घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांनुसार अमित शाह हेच या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचे सिद्ध होत आहे, मात्र सीबीआयने या पुराव्यांकडे दुर्लक्ष केले, असे पिल्ले यांनी या याचिकेत सांगितले आहे. सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या चार पोलीस अधिकाऱ्यांवर पुरवणी आरोपपत्रात ठपका ठेवला. मात्र शाह यांच्यावर कोणताही आरोप करण्यात आलेला नाही, असे पिल्ले यांचे म्हणणे आहे.