आयसिस या दहशतवादी संघटनेचे मॉड्यूल राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) उद्ध्वस्त केले असून लुधियाना येथून तपास यंत्रणेने एका मौलवीला ताब्यात घेतले आहे. मदनी मशिदीतील मौलवी मोहम्मद ओवैस याला यंत्रणेने ताब्यात घेतले आहे.

मोहम्मद ओवैस हा विशीतील तरुण उत्तर प्रदेशमधील रामपूर येथून लुधियाना येथील मशिदीत महिनाभरापूर्वीच आला होता. मशितील मौलवीसोबत तो मदरशात विद्यार्थ्यांना शिकवत देखील होता. मोहम्मद हा आमच्याकडील कायमस्वरुपी कर्मचारी नव्हता. तो नुकताच आमच्याकडे रुजू झाला होता, असे मशिदीशी संबंधित व्यक्तीने सांगितले.

मोहम्मद हा रोजगाराच्या शोधात उत्तर प्रदेशमधून लुधियानात गेला होता. लुधियानातील जोधेवाल पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मोहम्मद जमील यांनी देखील एनआयएच्या कारवाईला दुजोरा दिला. एनआयएने मशिदीतून मौलवीला ताब्यात घेतल्याचे जमील यांनी सांगितले.

दरम्यान, डिसेंबर महिन्यात एनआयएने दिल्लीसह उत्तर भारताच्या इतर भागांमध्ये राजकीय नेते आणि सरकारी आस्थापनांमध्ये घातपाती कृत्ये करण्याचा कट रचल्याप्रकरणी काही तरुणांना अटक केली होती. सर्व जण हरकत- उल- हर्ब- ए- इस्लाम असे या दहशतवादी संघटनेचे नाव आहे. ही संघटना आयसिसशी संबंधित आहे. याच प्रकरणाचा तपास करताना ही नवी माहिती समोर आली होती.

गुरुवारी एनआयएने पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील सात ठिकाणांवर छापा टाकला. उत्तर प्रदेशमधील अमरोहा आणि हापूडसह अन्य ठिकाणांवर छापे टाकले आहेत. हापूड येथे दोन संशयित युवकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.