इंडोनेशियाच्या सुरक्षारक्षकांनी बुधवारी आयसिसशी संबंधित एका दहशतवाद्याला पकडल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर दहशतवाद्याचे नाव मोहम्मद बसरी असे असून तो इस्टर्न इंडोनेशिया मुजाहिद्दीचा सदस्य आहे. पोसो जिल्ह्य़ातील सुलावेसी बेटावर पोलीस आणि लष्कराने संयुक्त कारवाई करून बसरी याला पकडले तर त्याच्या साथीदाराला ठार मारले.

पोसोच्या दक्षिणेकडील तटवर्ती क्षेत्रावर बुधवारी सकाळी त्याला पकडण्यात आल्याचे पोलीस प्रवक्ते बॉय राफली अमर यांनी सांगितले. बसरी याला नजीकच्या शहरात नेण्यात आले आहे. इंडोनेशियातील कुख्यात दहशतवादी संतोसो याला सैनिकांनी ठार मारले. आयसिसशी संबंधित संतोसोचा गेल्या वर्षभरापासून शोध घेण्यात येत होता. त्याला ठार करण्यात आल्याने मुस्लीमबहुल देशातील अधिकाऱ्यांचा हा मोठा विजय मानण्यात येत आहे.

संतोसो आणि त्याच्या गटाने अंतर्गत सुरक्षा रक्षकांवर जीवघेणे हल्ले चढविले होते, इतकेच नव्हे तर त्याने अनेक दहशतवाद्यांना प्रशिक्षणही दिले होते. बसरी हा ईस्टर्न इंडोनेशिया मुजाहिद्दीचा म्होरक्या होता, गेल्या अनेक वर्षांपासून तो सुलावेसीच्या जंगलात दडून बसला होता. संतोसोला ठार मारण्यात आल्यानंतर सर्व सूत्रे बसरीच्या हातात होती.