‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया’ (आयएसआयएस) ही अत्यंत धोकादायक दहशतवादी संघटना पाकिस्तानात मोठय़ा प्रमाणावर हातपाय पसरण्याचा प्रयत्न करीत असून त्याद्वारे तेथे आपला प्रभाव वाढविण्याच्या बेतात आहे. पेशावर, अफगाणिस्तान सीमेवरील प्रांत व अन्यत्र जिहादला पाठिंबा मिळविण्यासाठी या संघटनेमार्फत माहितीपत्रकेही वाटण्यात येत आहेत.
पुश्तू अणि दारी भाषेत लिहिलेल्या ‘फताह’ या पुस्तिकेचे वाटप पेशावर शहरात तसेच खैबर पख्तुन्वा येथे करण्यात आले. ‘फताह’चा अर्थ विजय असा आहे. पेशावरमध्ये कार्यरत असलेल्या काही अफगाण पत्रकारांनाही या पुस्तिकेच्या प्रती अत्यंत गूढरीत्या पाठविण्यात आल्याचे वृत्त ‘एक्स्प्रेस ट्रिब्युन’ने दिले आहे. सदर पुस्तिकेच्या अंतिम पानावर छापलेले संपादकाचे नाव बनावट असल्याचा संशय असून त्याची छपाई कोठे झाली, याचाही उलगडा होऊ शकत नसल्याचे ‘ट्रिब्युन’ने म्हटले आहे.
पुस्तिकांच्या वाटपाखेरीज ‘आयएसआयएस’च्या काही समर्थकांनी भिंतींवरही लिखाण करून स्थानिकांनी आपल्या संघटनेत यावे आणि पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे. काही मोटारी आणि वाहनांवरही ‘आयएसआयएस’चे स्टिकर्स चिकटविण्यात आले आहेत.