गाझापट्टीत गेले दहा दिवस चाललेल्या नरसंहाराची दखल अखेर संयुक्त राष्ट्रांना घ्यावी लागली. संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीनेच गुरुवारी पाच तासांसाठीची शस्त्रसंधी इस्त्रायल आणि ‘हमास’ यांनी स्वीकारली. अर्थात दोन्ही देशांत कायमस्वरूपी शस्त्रसंधी व्हावी यासाठी मध्यस्थ देशांमध्ये मॅरेथॉन बैठका सुरू होत्या.
गाझातील किनारी भागांत इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात चार मुलांचा बळी गेल्यानंतर मध्यपूर्व शांततेसाठीचे संयुक्त राष्ट्रांचे समन्वयक रॉबर्ट सेरी यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना मानवी दृष्टिकोनातून शस्त्रसंधी स्वीकारण्याचे आवाहन केले.
दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधी स्वीकारण्यात आली आहे. या काळात पॅलेस्टिनी जनतेला पुरेसे अन्न, पाणी आणि इतर गरजा साठवता येणार आहेत. बैठक संपल्यानंतर काही वेळातच दक्षिण इस्त्रायलमध्ये लाल रंगाचा एक पट्टा आकाशात उमटवण्यात आला. त्यानंतर गाझावरील हल्ले पाच तासांसाठी थांबवण्यात आले. या काळात पॅलेस्टिनींनी दुकानांमध्ये जाऊन काही खाद्यपदार्थ घरी आणले, तर काहींनी बँकांमधून पैसे काढले.
मानवी गरज म्हणून हल्ले आणि प्रतिहल्ले थांबले आहेत आणि ते सकाळी १० ते दुपारी या वेळेत होणार नाहीत, असे ‘हमास’चा प्रवक्ता सामी अबु झहुरी याने एका संदेशात स्पष्ट केले.
शस्त्रसंधीचा स्वीकार इस्त्रायलने आधीच केला होता, परंतु ‘हमास’ ने पुन्हा काही आगळीक केल्यास आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा पंतप्रधानांनी दिला होता.
पाच तासांच्या शस्त्रसंधीनंतरही इस्त्रायलने या कराराचा ‘हमास’ने कोणताही गैरवापर करू नये. हा करार मानवी दृष्टिकोनातून झाला आहे आणि पॅलेस्टिनींनी त्याचा वापर हल्ल्यासाठी करू नये, अशी आमची अपेक्षा आहे. परंतु जर त्यांनी तो हल्ल्यासाठी केला तर आम्ही तितक्याच तोडीचा वा त्यापेक्षा अधिक भयानक हल्ला करू, असे इस्त्रायल संरक्षण दलांनी आपल्या निवेदनात ठामपणे सांगितले.