इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू अडचणीत आले आहेत. इस्रायलमधील पोलिसांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी नेतान्याहू यांच्या विरोधात खटला चालवण्याची शिफारस केली असून याबाबतचा अंतिम निर्णय आता अॅटर्नी जनरल घेणार आहेत. मात्र, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नेतान्याहू राजीनामा देणार नाही, ते या पदावर कायम असतील, असे सत्ताधाऱ्यांनी म्हटले आहे.

भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणांमुळे नेतान्याहू अडचणीत आले आहेत. पहिल्या प्रकरणात नेतान्याहू यांनी इस्रायलमधील एका वृत्तपत्राच्या प्रकाशकाला सरकारच्या सकारात्मक बातम्या द्यायला सांगितले होते. तर दुसऱ्या प्रकरणात नेतान्याहू यांनी पदावर असतानाही महागड्या भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप आहे. सिगारेट, शँपेन, ज्वेलरीचा यात समावेश होता. हॉलिवूडमधील ख्यातनाम निर्माता, ऑस्ट्रेलियातील अब्जाधीशाकडून त्यांनी या भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप आहे. नेतान्याहू यांनी तब्बल २ लाख डॉलरपर्यंतच्या भेटवस्तू स्वीकारल्याचे सांगितले जाते. हॉलिवूडमधील निर्मात्याला अमेरिकेचा व्हिसा मिळवून देण्याच्या मोबदल्यात त्यांना या भेटवस्तू मिळाल्याचे सांगितले जाते. या प्रकरणांचा तपास करणाऱ्या इस्रायल पोलिसांनी अखेर पुरावे सापडल्याचा दावा केला आहे. याआधारे नेतान्याहू यांच्याविरोधात खटला चालवावा, अशी शिफारस पोलिसांनी केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सात वेळा नेतान्याहू यांची चौकशी केली होती.

नेतान्याहू यांच्यावर खटला चालवायचा की नाही याचा अंतिम निर्णय अॅटर्नी जनरल घेणार आहेत. आगामी महिनाभरात चर्चा करुन ते अंतिम निर्णय घेतील, असे इस्रायलच्या माध्यमांनी म्हटले आहे. इस्रायलमधील कायदा मंत्री अॅलेत शकेद यांनी हा खटला चालणार असला तरी पंतप्रधान राजीनामा देणार नाही, असे स्पष्ट केले. तर नेतान्याहू यांनी देखील इस्रायली वृत्तवाहिनीशी बोलताना हे आरोप फेटाळून लावले. भ्रष्टाचाराचे आरोप निराधार आहे. मी जनतेची सेवा करत असून या पासून मला कोणीही रोखू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. ६८ वर्षीय नेतान्याहू यांची पंतप्रधानपदाची ही दुसरी टर्म आहे. नेतान्याहू यांच्यावर गंभीर आरोप आहेत. पंतप्रधानांवर असे आरोप असताना त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली आहे.या प्रकरणात दोषी ठरल्यावरच नेतान्याहू यांना राजीनामा देणे बंधनकारक असेल, असे सूत्रांनी सांगितले.