बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीने मोठी आघाडी घेतली होती. मात्र, नंतर हे चित्र बदललं. दुपारनंतर एनडीएने महाआघाडीला पिछाडीवर टाकल आहे व सध्या भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरु आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं सध्या तरी आहेत. या पार्श्वभूमीवर आता राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांची मुलगी राजलक्ष्मी यादव हिने ट्विट केले आहे.

“निसर्गाचा नियम आहे सायंकाळ होताच कमळ कोमजतं अन् कंदील प्रकाश देतो. Be positive, आपण जिंकणार आहोत.” असं राजलक्ष्मी यादव यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, बिहार निवडणुकीच्या निकालात नेमकी सत्ता कुणाला मिळणार हे चित्र स्पष्ट होण्यासाठी विलंब लागतो आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी काळजी घेऊन मतमोजणी केली जाते आहे. त्यामुळे हा वेळ लागतो आहे. अशात राजदचे खासदार मनोज झा यांनी बिहारमध्ये आमचीच सत्ता येणार असा दावा केला आहे. एवढंच नाही तर निवडणूक निकाल प्रक्रिया लांबल्याने नितीश कुमार यांचा पराभव काहीसा लांबणीवर पडेल. मात्र इथल्या जनतेला परिवर्तन हवं आहे आणि ते परिवर्तन घडेल असंही झा यांनी म्हटलं आहे.