मुस्लिम तरुण ऑनलाइन ऑर्डर केलेलं जेवण घेऊन येणार म्हणून एका ग्राहकाने झोमॅटोची ऑर्डर रद्द केली. या ग्राहकाने झोमॅटोला टॅग करुन आपली नाराजी कळवल्यानंतर झोमॅटोने दिलेल्या भन्नाट उत्तराने नेटकऱ्यांनी मने जिंकून घेतली. झोमॅटोने टि्वट करुन दिलेले उत्तर चर्चेत असताना आता ही ऑर्डर रद्द करणाऱ्या अमित शुक्लाने या संपूर्ण वादावर आपली बाजू मांडली आहे.

“संविधानाने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. श्रावण महिना सुरु आहे. त्यामुळे डिलिव्हरी बॉय बदलण्यास सांगितला. आता यापुढे मी झोमॅटोवरुन काहीही ऑर्डर करणार नाही. मी पैसे मोजतोय त्यामुळे एखादी गोष्ट नाकारणे हा माझा अधिकार आहे. मी जेवण ऑर्डर केले त्यांनी एका बिगर हिंदू माणसाला डिलिव्हरी करण्यासाठी पाठवले. मी जेव्हा त्यांना डिलिव्हरी बॉय बदलण्यास सांगितला. तेव्हा त्यांनी नकार दिला. त्यामुळे मी ऑर्डर रद्द केली” असे अमित शुक्लाने  इंडिया टुडेशी बोलताना सांगितले. “मी केलेल्या टि्वटमध्ये काहीही धार्मिक नव्हते पण टि्वटरवर असलेल्या एका गटाने त्याला धार्मिक रंग दिला” असे अमित शुक्लाचे म्हणणे आहे.

नेमकं काय घडलं
झोमॅटोवरून जेवणाची ऑर्डर केल्यानंतर कंपनीकडून डिलिव्हरीसाठी मुस्लिम तरुणाला पाठवल्याचं समजताच एका हिंदू व्यक्तीने आपली ऑर्डर रद्द करण्याचा इशारा ट्विटरद्वारे झोमॅटोला दिला होता. त्यावर आम्ही डिलिव्हरी बॉय बदलणार नाही असं झोमॅटोने स्पष्ट केल्यानंतर या व्यक्तीने त्याची ऑर्डर रद्द केली आणि पुन्हा एकदा झोमॅटोला ट्विटरद्वारे मला माझे पैसे देखील परत नको पण मी ऑर्डर रद्द करत असल्याचं कळवलं. त्यावर झोमॅटोने भन्नाट उत्तर या व्यक्तीला दिलं असून नेटकऱ्यांना झोमॅटोने दिलेलं उत्तर चांगलंच भावलंय.


झोमॅटोने ‘अन्नाला धर्म नसतो, अन्न हाच धर्म असतो’ अशा आशयाचं ट्विट केलं आणि या तरुणाची बोलतीच बंद केली. झोमॅटोकडून देण्यात आलेलं हे उत्तर नेटकऱ्यांना चांगलच भावलं.