शपथविधीनंतर वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांचा निर्णय

अमरावती (आंध्र प्रदेश)

वायएसआर काँग्रेसचे नेते वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी गुरुवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्य विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळविला. आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर जगनमोहन रेड्डी हे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. गरीब वयोवृद्धांच्या निवृत्तीवेतनामध्ये वाढ करण्याचे आदेश जगनमोहन यांनी दिले.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रेड्डी यांनी गरीब वयोवृद्धांच्या निवृत्तीवेतनामध्ये एक हजार रुपयांवरून तीन हजार रुपये वाढ करण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली. वायएसआरसीने निवडणुकीपूर्वी नऊ आश्वासने दिली होती त्यापैकी हे एक आश्वासन होते.

राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांनी जगनमोहन यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजयवाडा येथील आयजीएमसी स्टेडियमवर झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात तेलुगु भाषेतून शपथ घेतली तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. वायएसआर काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीतही २२ जागा पटकावल्या आहेत.

रेड्डी यांच्या मातोश्री आणि वायएसआरसीच्या मानद अध्यक्षा वाय. एस. विजयम्मा, रेड्डी यांची पत्नी भारती आणि बहीण शर्मिला आणि कुटुंबातील अन्य सदस्य यांची व्यासपीठावर बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

अन्य मंत्र्यांचा शपथविधी ७ जून रोजी

वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनीच गुरुवारी शपथ घेतली असून मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांचा शपथविधी ७ जून रोजी होण्याची शक्यता आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, द्रमुकचे नेते एम. के. स्टालिन हे विशेष अतिथी म्हणून या वेळी हजर होते.