आम आदमी पक्षावर उधळलेल्या स्तुतिसुमनांमुळे पक्षश्रेष्ठींच्या ‘भुवया उंचावल्याने’ केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी कोलांटउडी मारली. ‘आम आदमी पक्ष’ हा राजकीय पक्ष नसून ते राजकीय व्यासपीठ आहे, आणि अशांमुळे देशभरात अराजकसदृश परिस्थिती उद्भवू शकते, असे मत रमेश यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
‘लक्षात घ्या, आम आदमी पक्ष हा राजकीय पक्ष नसून लोकांच्या निषेध भावनांचे ते व्यासपीठ आहे. काँग्रेस पक्षासारखी विचारधारा, शासनपद्धती, कार्यालय, कार्यालयीन व्यवस्था या बाबी ‘आप’कडे नाहीत. आणि जर पक्ष नसेल, तर देशात फक्त अराजकच माजू शकते’, असे जयराम रमेश म्हणाले.
१२८ वर्षांची परंपरा असलेला काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात प्रचंड तफावत असल्याचे त्यांनी नमूद केले. दोनच दिवसांपूर्वी ‘आम आदमी पक्ष अत्यंत वैध मुद्दे उचलत असून त्यांची टिंगल करू नका’, असा इशारा केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी दिला होता. मात्र त्यावर पक्षातील स्वकीयांकडून बरीच टीका झाल्याने त्यांनी घूमजाव करीत आपली भूमिका बदलली.
दिल्लीत त्यांनी आपली पताका रोवली हे खरेच, पण राष्ट्रीय पातळीवर त्यांना कितपत यश मिळेल याबाबत आताच भाकीत करणे जरा अधीरपणाचे ठरेल, असे मत त्यांनी आम आदमी पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील संभाव्य यशाबद्दल बोलताना मांडले.