दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथून जैश-ए-मोहम्मदचा वाँटेड दहशतवादी फैय्याज अहमद लोनला अटक केली आहे. त्यांच्यावर दिल्ली पोलिसांनी दोन लाखाचे इनाम ठेवले होते. त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. साल २०१५ पासून तो अटक टाळण्यासाठी पळत होता.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा पथकं आणि तपास यंत्रणांनी जैश-ए-मोहम्मद विरोधातील आपली मोहिम अधिक तीव्र केली आहे. १४ फेब्रुवारीनंतर सैन्य दलाने जैशच्या अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. भारतीय यंत्रणा जैशचे कंबरडे मोडून टाकण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. शक्य त्या सर्व मार्गांनी जैशची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

१४ फेब्रुवारीला जैशच्या दहशतवाद्याने पुलवामा येथे स्फोटकांनी भरलेले वाहन सीआरपीएफच्या ताफ्यातील बसला धडकवले होते. यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले. त्यानंतर २६ फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाने जैश-ए-मोहम्मदच्या पाकिस्तान बालकोटमधील तळावर एअर स्ट्राइक केला. ज्यामध्ये अनेक दहशतवादी, त्यांच्या ट्रेनर्सचा खात्मा झाला.