सुंजुवानच्या लष्करी तळावरील हल्ल्यासह जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या अलीकडच्या पाच आत्मघातकी हल्ल्यांचा सूत्रधार मुफ्ती वकास ठार मारला गेल्यामुळे, भारताच्या इतर भागांनाही लक्ष्य बनवण्याची योजना आखणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेला जोरदार धक्का बसला आहे.

काश्मीर पोलीस आणि लष्कर यांनी गेल्या ५ मार्चला दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्य़ातील हैतवारा खेडय़ात राबवलेल्या वेगवान मोहिमेत, अबू अन्सार या ‘सांकेतिक नावाने’ वावरणारा वकास हा राजधानी श्रीनगरपासून केवळ २१ किलोमीटर अंतरावर ठार झाला होता.

१० फेब्रुवारीला जम्मूतील सुंजुवान लष्करी तळावरील हल्ल्यानंतर अफगाणिस्तानातील अतिरेकी वकास हा पाकिस्तानातील ‘सूत्रधारांना’ अद्ययावत माहिती पुरवत असल्याने तो सुरक्षा दलांच्या निशाण्यावर होता. ‘यापुढील हल्ला’ देशाच्या अंतर्भागात राहील अशी हमीही तो त्यांना देत होता.

युवकांना आत्मघातकी हल्लेखोर बनण्यासाठी प्रेरित करण्याच्या कौशल्यामुळे ‘किलिंग मशीन’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या वकास याचा छडा लावण्याच्या विशिष्ट उद्देशाने पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले होते. फरदीन खांडे (१६) व मंझूर अहमद बाबा (२१) या दोघांना कट्टरवादाकडे वळवून त्यांना ‘फिदायीन’ (आत्मघातकी हल्लेखोर) बनवण्यात वकासचा हात असल्याचे आढळले होते.

एका पाकिस्तानी नागरिकासह या दोघांनी दक्षिण काश्मिरातील लेथपोरा येथील सीआरपीएफच्या एका तळावर ३०-३१ डिसेंबरच्या मध्यरात्री हल्ला करून सुरक्षा दलाच्या पाच जणांना ठार मारले होते. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत हे तिन्ही दहशतवादी ठार झाले होते.