‘जैश’च्या म्होरक्याने गरळ ओकली

पठाणकोटमध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे पुरावे भारताने पाकिस्तानला दिल्यानंतर पाकिस्तान सरकारने या दहशतवादी संघटनेविरुद्ध कारवाई करण्यासाठी पावले उचलल्यानंतर या संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझर याने पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. सरकार जो मार्ग चोखाळत आहे तो पाकिस्तानसाठी अत्यंत धोकादायक असल्याचा इशारा अझरने दिला आहे.

देशातील मशिदी, मदरसे आणि जिहादींविरुद्ध पाकिस्तान सरकारने जी पावले उचलली आहेत त्यामुळे पाकिस्तानचे ऐक्य आणि अखंडता धोक्यात आली आहे, असे अझरने लिहिले आहे. जैशचे ऑनलाइन मुखपत्र समजल्या जाणाऱ्या ‘अल-कलाम’वर त्याने सैदी या टोपण नावाने हे लिखाण केले आहे.

तिहार, कोत भालवल, जम्मूतील कारागृह आणि पाकिस्तानातील बहावलपूर कारागृहात असतानाचे संदर्भ अझरने या लिखाणात नमूद केले आहेत. पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर अझरला नजरकैदेत ठेवण्यात आले होते, त्याचाही संदर्भ देण्यात आला आहे.