भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी प्रतिनिधीगृहात काश्मीरमधील र्निबध हटवण्याचा प्रस्ताव मांडणाऱ्या भारतीय वंशाच्या सदस्य प्रमिला जयपाल यांना भेटण्याचे टाळल्याबाबत वरिष्ठ डेमोक्रॅटिक सिनेटर कमला हॅरिस यांनी टीका केली आहे.  त्या म्हणाल्या की, ‘अमेरिकी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळात कुणाचा समावेश असावा हे ठरवण्याचा अधिकार कुठल्या परदेशी सरकारला नाही (भारत सरकार). त्यामुळे प्रमिला जयपाल यांचा प्रतिनिधी मंडळात समावेश केल्याने त्या प्रतिनिधी मंडळास भेटण्याचे टाळून जयशंकर यांनी चूकच केली आहे.’ सिनेटर एलिझाबेथ वॉरेन यांनीही जयपाल यांना पाठिंबा दिला होता. वॉरेन या अध्यक्षीय उमेदवारीसाठी शर्यतीत आहेत. वॉरेन यांनी म्हटले आहे की,‘ भारत व अमेरिका यांच्यात चांगली भागीदारी आहे, पण जर योग्य संवाद ठेवला तरच ती टिकू शकते. लोकशाही व मानवी हक्क यांचे रक्षण भारताने करणे महत्त्वाचे आहे. प्रमिला जयपाल यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न अयोग्य होता.’