सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) मागील वर्षी डिसेंबर महिन्यात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता. या वादानंतर दिल्लीत काही ठिकाणी जाळपोळ झाली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी ‘जामिया’त घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. देशभरात या मारहाणीचा निषेध करण्यात आला. अखेर दोन महिन्यांनंतर जामियात पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला आहे. जामिया समन्वय समितीनं (JCC) हा व्हिडीओ जारी केला आहे.

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील आंदोलनानंतर पोलिसांनी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर लाठीमार केला होता. पोलिसांनी विद्यापीठाच्या ग्रंथालयात जाऊन अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा दावा विद्यार्थी संघटनांनी केला होता. १५ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या जामिया समन्वय समितीनं हा व्हिडीओ ट्विटरवरून जारी केला आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये ?

विद्यापीठातील ग्रंथालयामध्ये विद्यार्थी अभ्यास करत बसलेले असताना अचानक पोलीस घुसतात. ग्रंथालयातील वस्तूंची तोडफोड करत पोलीस विद्यार्थ्यांनी मारहाण करताना दिसत आहे. अचानक पोलीस मारहाण करत असल्यानं विद्यार्थी गांगरून गेल्याचं चित्र सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. “पोलीस राज्य पुरस्कृत हिंसेची अमलबजावणी करत आहेत. जामियाचे विद्यार्थी अभ्यासिकेत परीक्षेची तयारी करत असताना पोलिसांनी अमानुषपणे त्यांना मारहाण केली,” समन्वय समितीनं म्हटलं आहे.

कुलगुरूंनीही केला होता निषेध-

दिल्ली पोलिसांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांची धरपकड केली. यावेळी झालेल्या धुमश्चक्रीनंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला. या पोलीस कारवाईचा विद्यापीठाच्या  कुलगुरू नजमा अख्तर यांनी घटनेनंतर निषेध केला होता. तर दुसरीकडे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. जमाव खूप हिंसक झाला होता. विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे, असं पोलिसांनी म्हटलं होतं.