देशात सध्या करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत अनेक उद्योगधंदे ठप्प असल्यानं लोकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण दुसरीकडे जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. या विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला तब्बल वार्षिक ४१ लाख रूपयांच्या नोकरीची ऑफर मिळाली आहे. जामिया विद्यापीठात सध्या प्लेसमेंट सुरू आहे. करोना व्हायरच्या संकटापूर्वीच ही प्लेसमेंट सुरू करण्यात आली होती. परंतु सध्या ही ऑनलाइन पद्धतीनं राबवण्यात येत आहे. प्रथम बत्रा असं मायक्रोसॉफ्टकडून ऑफर मिळालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे.

प्रथम बत्रा हा जामिया विद्यापीठातील बी.टेक या कोर्सचा विद्यार्थी आहे. मायक्रोसॉफ्ट इंडियानं त्याला ४१ लाख रूपये वार्षिक पॅकेजची ऑफर दिली आहे. प्रथम हा गाझियाबादचा रहिवासी असून त्याला मिळालेलं पॅकेज हे जामियातील इंजिनिअरिंग विभागात देण्यात आलेलं सर्वाधिक पॅकेज असल्याचं म्हटलं जात आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. प्रथम बत्राला १२ वीच्या परीक्षेतही घवघवीत यश मिळालं होतं. तो १२ वीच्या परीक्षेत ९०.४ टक्के मिळवत उत्तीर्ण झाला होता.

२५७ जणांना ऑफर

जामिया विद्यापीठाच्या प्लेसमेंट सेलनं प्लेसमेंटच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात करोनच्या संकटापूर्वीच म्हणजे अखेरच्या सेमिस्टरपूर्वीच केली होती. यादरम्यान ५२ कंपन्यांनी विविध कोर्स करणाऱ्या २५७ विद्यार्थ्यांना नोकरीची ऑफर दिली आहे. मायक्रोसॉफ्ट इंडियानं बी.टेकमध्ये शिकणाऱ्या प्रथम बत्राला ४१ लाख रुपये वार्षिक तक आभा अग्रवाल या विद्यार्थिनीला ८० हजार रूपये प्रती महिना स्टायपेंट देत इंटर्नशिप दिली आहे.

अनेक कंपन्यांचा सहभाग

जामिया विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अहमद अझीम यांनी सांगितलं की, “प्लेसमेंटमध्ये सॅमसंग आर अँड डी, सिमेन्स, महिंद्रा कॉमविवा, वेदांता लिमिटेड, एनआयआयटी, एल अँड टी लिमिटेड, अमेरिकन एक्स्प्रेस, विप्रो टेक्नॉलॉजी, आयबीएम, एल अँड टी कंस्ट्रक्शन, इनोव्हेसर, टीएफटी, स्प्रिंगबोर्ड, न्यूझेन टेक्नोलॉजीज, जिया सेमिकंडक्टर्स, टीसीएस, ओवायओ, एव्हीआयझेडव्हीए, फुजित्सु कंसल्टिंग, जेएलल कंसल्टिंग, अझीम प्रेमजी फाऊंडेशन, शेअरइट, टिव्ही ९, सीआयएनआयएफ ग्रुप, ऑपटम यूनाइटेड हेल्थ ग्रुप या कंपन्यांचा समावेश आहे.”

ऑनलाइन प्लेसमेंटसाठी संपर्क

“जामियाचे प्लेसमेंट सेल लॉकडाउन दरम्यान इंटर्नशिप आणि नोकऱ्यांठी ऑनलाइन प्लेसमेंटसाठी अनेकांशी संपर्क साधत आहे. यामध्ये अॅमेझॉन, बायजूस, ब्लोम्ब्रेन, कनेक्ट २ सर्व्हे, आरटीडीएस, हायरटेक, स्टरलाइट, डेटामार्क, एनआयआयटी लिमिटेड, सॅमसंग डिस्प्ले, हंड्रेड प्लस, वायस्कूल, डार्क फिनिक्स स्टुडियोज (एमओ ऑन टिव्ही), ई-व्हिजन टेक्नोसर्व्ह, हॅवेल्स, मोर सोलार यां सारख्या कंपन्यांशी संपर्क साधत असल्याची माहितीही अहमद अझीम यांनी दिली.