जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे राजीनामा सत्र सुरूच आहे. आता पुन्हा एकदा भाजपाच्या चार नेत्यांनी आपला राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे. दरम्यान, या अगोदर आज सकाळी जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथील भाजापाचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हमीद नजार यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात नजार हे जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती काहीशी चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

भाजाप नेते व कार्यकर्त्यांवर दहशवाद्यांकडून हल्ला होण्याच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांत वाढ झाल्याचे दिसत आहे. या अगोदर ६ ऑगस्ट रोजी कुलगाम जिल्ह्यातील काजीगुंड ब्लॉकच्या वेस्सु गावात भाजपाचे सरपंच सजाद अहमद यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता,ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.

जम्मू-काश्मीरमधे भाजपाच्या चार नेत्यांनी बडगाममध्ये राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्या नेत्यांमध्ये बडगामचे सरचिटणीस आणि एमएम मोर्चा बडमगामचे सरचिटणीस यांचा समावेश आहे. या अगोदर देखील अनेक भाजपा नेत्यांनी राजीनामा सोपवलेला आहे. कुलगामच्या देवसर येथील भाजपाचे सरपंच, भाजपा नेते सबजार अहमद पाडर, निसार अहमद वानी आणि आशिक हुसैन पाला यांनी राजीनामा दिलेला आहे. वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भाजपात राजीनामा सत्र सुरू झालं असल्याचं बोललं जात आहे.

जम्मू-काश्मीरचे भाजपा अध्यक्ष रविंदर रैना यांनी या हल्ल्यांना भ्याड हल्ले असे संबोधले आहे. काश्मीर खोऱ्यात भाजपा कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमधुन पाकिस्तानचे वाढते नैराश्य दिसत आहे. मात्र, या भ्याड हल्ल्यांना पक्ष घाबरणार नाही. अशा प्रकारेच भ्याड हल्ले करून पाकिस्तान काश्मीर खोऱ्यातील भाजपाची वाढती प्रसिद्धी थांबवू शकत नाही. आज काश्मीर खोऱ्यातील प्रत्येक चौकात, कोपऱ्यावर भाजपाने तिरंगा ध्वज पोहचवला आहे. यामुळे पाकिस्तानला नैराश्य आले आहे. यामुळेच दहशतवाद्यांमार्फत भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात आहेत. मात्र, आम्ही आमचे कार्य अधिक जोमाने पुढे नेणार आहोत. आम्ही येथील प्रत्येक घरात तिरंगा ध्वज व भाजपाचा झेंडा पोहचवणार आहोत, असं रैना यांनी सांगितलं आहे.